कोल्हापूर : येथील श्री दादूमामा ट्रस्टतर्फे दहावीच्या परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने ट्रस्टचे अध्यक्ष एम. डी. देसाई यांनी एक वेगळीच सामाजिक बांधीलकी जपली.देसाई हे निवृत्त वायुसैनिक आहेत. त्यांना मिळणाऱ्या पेन्शनमधील रक्कम ते फूल ना फुलाची पाकळी म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांना बक्षीस म्हणून देतात. मुलांचा शोध घेणे, त्यांना संपर्क साधून सत्कारासाठी बोलाविणे यासाठी ते गेले आठवडाभर धडपडत होते.
प्रतिवर्षी ते हा उपक्रम न चुकता राबवितात. चार महिन्यांपूर्वी टाकाळा येथे अंध वृत्तपत्र विक्रेते सुरेश केसरकर यांचा अंगावर झाड पडून मृत्यू झाला. त्यांच्या अंध पत्नीस व मुलीस नुकसान भरपाईची रक्कम मिळवून देण्यासाठीही ते सरकारी कार्यालयांत अनेक दिवस हेलपाटे मारत होते. तेवढेच करून ते थांबले नाहीत; तर स्वत:जवळचे पाच हजार रुपये देऊन त्यांनी केसरकर यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी हातभार लावला.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देसाई, डॉ. राजाराम पाटील, संस्थेच्या उपाध्यक्ष इंदिरा देसाई यांच्या हस्ते झाला. अत्यंत साधेपणाने झालेल्या या कार्यक्रमात चंद्रशेखर तांदळे, दिव्या पवार, सिद्धार्थ कांबळे, ऐश्वर्या खाडे, रोहित कांबळे, महेश ढवळे, ओंकार मगदूम, आदेश जाधव यांचा प्रशस्तीपत्र, पुस्तक आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालकही उपस्थित होते.