आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १२ : स्वातंत्र्योत्तर काळात चीन, पाकिस्तान, बांगला देश यांच्याविरोधात लढाईत सहभाग घेऊन शौर्य गाजविणाऱ्या प्रादेशिक सेने (टी. ए. बटालियन)च्या निवृत्त जवानांना पेन्शनसह आतापर्यंतची फरकाची रक्कम मिळावी, यासाठी बुधवारी निवृत्त जवान व कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या मारत प्रशासनाचे लक्ष वेधले.कोल्हापूरसह सांगली, सातारा, बेळगाव येथील जवान यामध्ये सहभागी झाले.
जैव इंधन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामराव देसाई व प्रादेशिक सेना संघटनेचे अध्यक्ष मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौक येथून सकाळी साडे अकराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. हातात झेंडे व मागण्यांचे फलक घेतलेल्या आंदोलकांचा हा मोर्चा व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.
या ठिकाणी शामराव देसाई यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात प्रादेशिक सेना कार्यान्वित होती, ती आजही आहे. प्रादेशिक सेनेची तीन युनिट होती. प्रत्येक युनिटमध्ये ७३० पर्यंत जवानांची भरती केली जात असे. या जवानांना गरजेनुसार वर्षामध्ये काही काळ नोकरीस बोलाविले जाई. प्रतिवर्षी दोन महिन्यांचे सक्तीचे अॅम्युअल ट्रेनिंग (लष्करी प्रशिक्षण) घेतले जाई. १९६२, ६५ व ७१ आणि कारगील युद्धावेळी या जवानांनी सरकारच्या आदेशानुसार सहभाग घेतला. या लढाईत सहभाग घेतल्याबद्दल त्या कालावधीपुरताच पगार त्यांना देण्यात आला आहे. पगार काम केल्यापुरता असला तरी त्यांच्याकडून सर्व नियमांनुसार काम करवून घेतले आहे. ज्या ज्या वेळी युद्धात सहभाग घेतला, त्या वेळचे प्रमाणपत्र व मेडल्स या जवानांकडे आहेत.
सन १९८७ नंतर प्रादेशिक सेनेत भरती झालेल्या जवानांना कायमस्वरूपी सेवेत घेऊन नियमानुसार पगार आणि सेवानिवृत्तिवेतन दिले जाऊ लागले; पण, १९८७ पूर्वी प्रादेशिक सेनेतील सैनिकांना कोणतेही सेवापूर्ती, नंतरचे मानधन, पेन्शन दिली नाही. तसेच कॅँटीन व वैद्यकीय सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे जवानांना ताबडतोब पेन्शन चालू व्हावी व निवृत्तीनंतर आजअखेर सेवानिवृत्तीच्या भरपाईचा फरक एकरकमी देण्यात यावा. जे जवान हयात नाहीत त्यांच्या वारस कुटुंबीयांना याचा लाभ देण्यात यावा. असे या निवेदनात म्हंटले आहे.
आंदोलनात आनंद कुलकर्णी, श्रीपती कांबळे, बंडा कांबळे, महादेव गुरव, विष्णू गुरव, सविता जाधव, सुमन ढोले, शेवंता शिंत्रे, शिवाजी जाधव, आर.के. मुल्लाणी, दत्तात्रय पडळकर आदींसह निवृत्त जवान व त्यांचे कुटूंबिय सहभागी झाले होते. कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी निवृत्त जवान व त्यांच्या कुटूंबियांनी धडक मोर्चा काढून ठिय्या मारला. (छाया : नसीर अत्तार)