कोल्हापूर : पोलीस दलात काम करीत असताना विशिष्ट ज्ञान मिळते. या ज्ञानाचा भविष्यात समाजाला उपयोग झाला पाहिजे. निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीची असोसिएशन हे यासाठी चांगले माध्यम आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी केले. असोसिएशनच्या वार्षिक सभेत ते बोलत होते.कसबा बावड्यातील अलंकार हॉलमध्ये बुधवारी कोल्हापूर जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस महानिरीक्षक वारके म्हणाले, जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी असोसिएशनचे काम गौरवास्पद आहे. पोलीस बॉईजना भरतीसाठी, त्यांच्या करिअरसाठी ही संघटना योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकते.
तसेच कर्मचाऱ्यांची काही वैद्यकीय बिले, तसेच अन्य कागदपत्रे भरण्यासाठी त्यांनी मदत करावी. असोसिएशनच्या काही मागण्या असून त्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने पूर्ण सहकार्य केले जाईल. प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी संघटनेच्या कामाचे कौतुक करीत ही संघटना निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवेल, अशी आशा व्यक्त केली.संघटनेचे अध्यक्ष मदन चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी संघटनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देऊन कार्याचा आढावा घेतला. उपाध्यक्ष पी. जी. मांढरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
निवृत्त पोलीस उपअधीक्षक आणि संघटनेचे सचिव भारतकुमार राणे यांनी आभार मानले. विष्णू कुंभार, प्रभाकर पाटील, प्यारे जमादार, परशुराम रेडेकर, विलास देवडकर, मोहन मानकर, लक्ष्मण हवालदार, आनंदा बोडके, केशव डोंगरे, विलास पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतपुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या एक दिवसाच्या निवृत्तिवेतनाच्या ६५,००० रकमेचा धनादेश जिल्हा प्रशासनास देण्यात आला.