कोल्हापूर : सेवानिवृत्त शिक्षकाकडून २३ हजार रुपये लाच मागितल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत निष्पन्न झाल्याने पे युनिट (वेतन व भविष्य निर्वाह निधी-माध्यमिक) कार्यालयातील वरिष्ठ लिपिक उत्तम बळवंत कांबळे (वय ४६ रा. १/८३६, टाकवडे वेस, इचलकरंजी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सेवानिवृत्त शिक्षकांची फंडाची रक्कम मिळण्याकरिता प्रस्ताव तयार करून तो कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी कांबळे याने लाच मागितल्याचे ‘एसीबी’चे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.तक्रारदार हे ३१ मे २०२२ रोजी सहायक शिक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळण्याकरिता किणी हायस्कूलकडे रीतसर अर्ज केला. त्या अर्जावर प्रस्ताव तयार करून तो पुढील कार्यवाहीसाठी कोल्हापुरातील हत्तीमहल रोडवरील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील पे युनिट पथकाकडे पाठविला होता. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार हे कार्यालयात गेले.कार्यालयात उत्तम कांबळे हे वरिष्ठ लिपिक असून त्यांची अधीक्षकपदी नेमणूक आहे. तक्रारदारांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी निधी प्रस्तावाचे कामकाज लवकर पूर्ण करून त्यावर साहेबांंची सही घेऊन प्रकरण मंजूर करून ते सरकारी कोषागार कार्यालयात पाठवावे लागणार आहे. त्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्याबाबत तक्रारदाराने २२ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज केला.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २३ सप्टेंबरला पे युनिट कार्यालयात सापळा लावला, त्यावेळी वरिष्ठ लिपिक उत्तम कांबळे याने तक्रारदाराकडे २३ हजार रुपये लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
कोल्हापूर : सेवानिवृत्त शिक्षकाकडे २३ हजार रुपये लाचेची मागणी, वरिष्ठ लिपिकास अटक
By तानाजी पोवार | Published: September 27, 2022 5:07 PM