लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या सेवानिवृत शिक्षकांची गेल्या सहा महिन्यांपासून २० टक्के पेन्शन व सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम मिळावी, या मागणीचे निवेदन सेवानिवृत प्राथमिक शिक्षक वेलफेअर असोसिएशनने नगराध्यक्षा अलका स्वामी यांना दिले.
सेवानिवृत शिक्षकांची प्राधान्याने रक्कम देण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. यासाठी नगरविकास मंत्री व खासदार धैर्यशील माने यांच्याशी बैठक घेऊन यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्षा स्वामी यांनी दिले. पालिकेची आर्थिक स्थिती सध्या गंभीर असून, शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध झाल्यानंतर प्राधान्याने शिक्षकांची रक्कम दिली जाईल, असे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले. पालिकेच्या ४५० सेवानिवृत शिक्षकांना मार्च ते आॅगस्ट या सहा महिन्यांच्या कालावधीतील वीस टक्क्यांची साधारण सव्वाकोटी पेन्शनची रक्कम थकीत आहे. तसेच सातव्या वेतन आयोगातील फरकाच्या पहिल्या हप्त्याची रक्कमही अद्याप मिळालेली नाही. याबाबत पालिकेकडे वारंवार निवेदने व मागणी करूनही कोणतीही कार्यवाही होत नाही. नेहमी त्वरित रक्कम मिळेल, असे आश्वासन दिले जाते. यातील अनेक शिक्षक हे ७० वर्षापेक्षा अधिक वयाचे आहेत. या काळात त्यांना पेन्शनची नितांत गरज आहे. त्यामुळे यावर तोडगा काढावा, अशी मागणी केली. शिष्टमंडळात नगरसेवक अजित जाधव, मदन झोरे, महादेव गौड यांच्यासह सेवानिवृत शिक्षक यांचा समावेश होता.