कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथील रिक्षाचालक हृषिकेश लक्ष्मण कापूसकर (वय २७) यानी गुरुवारी त्यांना रिक्षात सापडलेले साडेसात तोळ्यांचे सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे परत केले. त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयामध्ये पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कामानिमित्त पती मुंबईला गेल्याने बाबूजमाल परिसरातील गीता रवींद्र कुंभार या दागिने पिशवीत घेऊन मुक्त सैनिक वसाहतीत आईकडे निघाल्या होत्या. दोन जुळी मुले सोबत होती. त्यांच्या शाळेच्या दप्तरात त्यांनी दागिन्यांची पर्स ठेवली. बुधवारी (दि. २५) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुलांसमवेत रंकाळा बसस्थानक येथे हृषिकेश कापूसकर यांच्या (एमएच ०९-सीडब्ल्यू २९९९) रिक्षामध्ये बसल्या. तेथून त्या मध्यवर्ती बसस्थानक येथे आल्या. रिक्षात बसल्यावर अडचण होते म्हणून बॅग रिक्षाच्या मागील बाजूस ठेवली होती. रिक्षातून मुले घाईत उतरल्याने त्याही उतरल्या. रिक्षाचालक कापूसकर हे मध्यवर्ती बसस्थानक येथील रिक्षाथांब्यावर रिक्षा नंबरमध्ये लावीत असताना त्यांना रिक्षात स्कूल बॅग दिसली. कापूसकर यांनी आजूबाजूला गीता कुंभार यांचा शोध घेतला; पण त्या दिसल्या नाहीत. त्यांनी या प्रकाराची माहिती मध्यवर्ती बसस्थानक रिक्षाथांब्यावर देऊन कापूसकर घरी गेले. घरी गेल्यानंतर कापूसकर यांनी रात्री बॅग तपासली असता त्यामध्ये लेडीज पर्स मिळून आली. त्या पर्समध्ये सोन्याचे दागिने होते. त्यांनी ती पर्स आपल्याजवळ ठेवली. गुरुवारी त्यांनी रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर ते शहर वाहतूक नियंत्रण शाखेत आले. त्यांनी पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील यांना भेटून माहिती दिली.दरम्यान, गीता कुंभार यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्या तातडीने वाहतूक शाखेच्या कार्यालयात दुपारी आल्या. ओळख पटविल्यानंतर त्यांना दागिने परत करण्यात आले.रात्रभर झोप नाहीसोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षात विसरल्याचे समजल्यावर रात्रभर झोप लागली नाही; परंतु जेव्हा ती शोधायला गेले व बॅग रिक्षात विसरल्याचे सांगितल्यावर, ‘कोल्हापूरचे रिक्षाचालक प्रामाणिक आहेत, बॅग तुम्हाला नक्की परत मिळेल,’ असा धीर पोलिसांपासून सर्वांनीच दिला व घडलेही तसेच, अशा भावना बॅग मिळल्यानंतर गीता कुंभार यांनी व्यक्त केल्या. सुमारे सव्वा दोन लाखांचा हा ऐवज आहे. कुंभार यांच्या पतीची आरटीओ कार्यालयाजवळ रेडियमच्या कामाची केबिन आहे. कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीमधील रिक्षाचालक हृषिकेश कापूसकर यांनी साडेसात तोळ्यांचे सापडलेले दागिने गीताकुंभार यांना शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात परत केले. यावेळी डावीकडून राजू जाधव, गीता कुंभार, पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील, आदी उपस्थित होते.
रिक्षाचालकाकडून साडेसात तोळ्यांचे दागिने परत
By admin | Published: May 26, 2016 11:33 PM