कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून संततधार बरसणाऱ्या पावसाने शनिवारी दिवसभर उघडीप दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पूरस्थिती कायम असून पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी दोन फुटांनी कमी झाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये पाणी तुंबलेले असून लष्कराच्या जवानांनी शिरोळ तालुक्यात बचाव कार्य सुरू केले आहे. मात्र पुणे, रत्नागिरी, बेळगाव, सावंतवाडी अशा चारही मार्गांवर पाणी आल्याने कोल्हापूरची चोहोबाजूंनी रस्ता कोंडी झाली आहे.
गुरुवारी रात्रीपासून पाणी वाढायला सुरुवात होऊन शुक्रवारी रात्री राजाराम बंधाऱ्याजवळची पाणी पातळी ५६ फुटांवर पोहोचली. या ठिकाणी ४३ फूट ही धोका पातळी आहे. परंतु शुक्रवारी रात्री १२ नंतर पावसाचा जोर ओसरला. शनिवारी सकाळी तर कोल्हापुरात कडक ऊन होते. दिवसभर पाऊस न झाल्याने तुंबून राहिलेल्या पाण्यामध्ये फारशी वाढ झाली नाही. उलट रात्री ८ वाजता राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी दोन फुटांनी कमी होऊन ती ५४ फुटांवर आली. याच पद्धतीने जिल्ह्याच्या धरणक्षेत्रातही गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने महापुराची तीव्रता कमी होईल, असा आशावाद आहे.
शहरातील शाहुपुरी, कुंभार गल्ली, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, न्यू पॅलेस शेजारील परिसर, कसबा बावड्याच्या परिसरात अजूनही पाणी मोठ्या प्रमाणावर असून शनिवारीही दिवसभर या ठिकाणी अनेक नागरिकांना घरातून बाहेर काढण्यात आले आहे. चिखली, आंबेवाडी येथील नागरिकांना शनिवारीही बाहेर काढण्यात आले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी दुपारनंतर जिल्हा परिषदेत बैठक घेऊन मदत कार्याचा आढावा घेतला. लष्कराचे जवान, एनडीआरएफ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या कामाचे पाटील यांनी कौतुक केले.
.........
दृष्टिक्षेपात महापूर
१ पूरग्रस्त ७६ हजार २६ व्यक्तींचे स्थलांतर
२ नातेवाईक यांच्याकडे ६७ हजार १११
३ निवारा कक्षात ८ हजार ९१२
४ छावणीमध्ये कोविड रूग्ण स्थलांतरित ४२
५ स्थलांतरित जनावरे- २५ हजार ५७३
६ पूरबाधित गावे ३६६
७ आतापर्यंत जीवित हानी ७ व्यक्ती
८ लहान -मोठ्या एकूण २७ जनावरांचा मृत्यू
९ गर्भवती ९० महिलांचे स्थलांतरण. पैकी ४ महिलांची यशस्वीरित्या प्रसूती
.............
धरणक्षेत्रात शनिवारपर्यंत झालेला पाऊस व याच दिवसापर्यंत मागच्या वर्षीचा पाऊस खालीलप्रमाणे-
राधानगरी- २६००/ १९००
तुळशी- २८४४/१०९८
कासारी- २७१७/ १७९७
कुंभी- ४३५२/ ३५९७
कोल्हापूर- ९४३/ ४२७
.........
दिव्यांगांना अनुदान
जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्रती व्यक्ती ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. २४ हजार लाभार्थ्यांना १ कोटी २१ लाख २१ हजार रुपये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत वाटप करण्यात येणार आहेत, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.