सातारा: भाजीविक्रीच्या निमित्ताने दीड वर्षापासून संबंधित महिलेशी झालेल्या ओळखीचे रुपांतर म्हणे एकतर्फी प्रेमात झाले. चिमुकल्याच्या जन्मानंतर कामाच्या निमित्ताने नेहमी होणाऱ्या भेटीगाठी थांबल्या गेल्या. त्यामुळे फोन तसेच मेसेज करून अभिजित त्या महिलेला त्रास देऊ लागला. त्यामुळे त्याची बेचैनी अधिकच वाढू लागली. ही त्याची बेचैनी अखेर चिमुकल्याचा खून करून सूड उगवण्यासाठी कारणीभूत ठरली.अभिजित लोखंडे याचे फलटण तालुक्यातील तडवळे हे गाव. या गावापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर काळज हे गाव आहे. या गावातील एका महिलेशी अभिजितची ओळख झाली होती. संबंधित महिलाही काहीवेळेला भाजीविक्री करण्यासाठी घराबाहेर पडत होती. त्यावेळी दोघांची चांगलीच ओळख झाली होती.
अनेकदा तो संबंधित महिलेला फोनवर भेटायला बोलवत होता. मात्र, ती महिला त्याला म्हणे प्रतिसाद देत नव्हती. त्या महिलेला तीन मुली झाल्यानंतर चौथ्या अपत्यवेळी मुलगा झाला. त्यामुळे घरात अगदी आनंदाचे वातावरण होते.
गत नऊ महिन्यांपासून त्या महिलेचे बाळाच्या संगोपनामुळे घराबाहेर पडणे बंद झाले होते. मात्र, त्या महिलेच्या प्रेमात अखंड बुडालेल्या अभिजितला अस्वस्थ वाटत होते. महिलेला भेटण्यासाठी तो आग्रह करायचा. घटनेच्या आठ दिवसांपूर्वी अभिजितने त्या महिलेला फोन केला. त्यावेळी संबंधित महिला आणि अभिजितची फोनवर चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली.
पुन्हा मला फोन केलास तर घरातल्यांना आणि पोलिसांना सांगेन, अशी धमकी त्या महिलेने अभिजितला दिली. त्यावेळी अभिजितने त्या महिलेला कोणतेही प्रतिप्रश्न केला नाही. परंतु त्यानंतर मात्र अभिजितच्या डोक्यात सूड उगवण्याचे षडयंत्र सुरू झाले. ज्या बाळामुळे ती घरात अडकलीय. त्याच बाळाला संपवले तर, असा विचार त्याच्या मनात आला आणि थंड डोक्याने कट रचण्यास सुरुवात केली.दोन दिवस सलग त्या महिलेच्या घराजवळ त्याने पाळत ठेवली आणि संधी मिळताच त्याने चिमुकल्याला झोळीतून अलगद उचलून जवळच असलेल्या विहिरीत फेकून देऊन खून केला. स्वत:ला प्रेमात बेचैन करणाऱ्या महिलेला म्हणे तो आनंदीत पाहू शकत नव्हता. त्यामुळेच त्याने त्या महिलेच्या अवघ्या दहा महिन्यांच्या बाळाचा जीव घेतला.चिमुकल्याच्या खुनानंतर अस्वस्थता शमली!अभिजितचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो भाजीविक्रीचा व्यवसाय करत एमपीएससीचा अभ्यास आणि पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता. पोलीस भरतीला केवळ एका मार्कासाठी त्याची निवड झाली नाही. तो अविवाहित आहे. चिमुकलीच्या खुनानंतर त्याची अस्वस्थता शमली होती. गावभर तो उजळ माथ्याने फिरत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चातापाचा लवलेश नसल्याचे पोलिसांनी सांगितले.