सदाशिव मोरेआजरा : आजऱ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. आजऱ्याचे महसूल नायब तहसीलदार तथा उपलेखापाल वर्ग ३ चे संजय श्रीपती इळके ( वय ५२ सध्या रा. उत्तूर ता. आजरा ), तलाठी राहुल पंडीतराव बंडगर ( वय ३३ जिजामाता कॉलनी आजरा, मुळ गाव कोल्हापूर ) या दोघांना पण ७५ हजारांची लाच घेताना जाळ्यात अडकले आहेत.देऊळवाडी ( ता.आजरा ) येथील गट नंबर २० मधील जमीन तानाजी रामू कालेकर यांच्याकडून तक्रारदार यांनी नोटरी करून घेतली आहे.ही वर्ग दोनची जमीन वर्ग-एक करण्याकरिता १ लाख ५० हजारांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ७५ हजार रुपये देण्याचे निश्चित केले होते.
आज ही रक्कम प्रशासकीय इमारतीच्या कॅटींगमध्ये देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे. पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सहायक फौजदार संजीव बंबरगेकर, अजय चव्हाण, पोलीस नाईक सुनील घोसळकर, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश माने यांनी ही कारवाई केली.