लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कामकाजासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या नेमणुका केल्या होत्या. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी शनिवारी ३०८ कर्मचारी नियुक्तीचे आदेश रद्द करीत तालुकास्तरावरील महसूल कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्याचे नव्याने आदेश दिले.
‘गोकुळ’ निवडणुकीसाठी कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील शिक्षकांसह इतर शासकीय ३०८ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. त्यांचे प्रशिक्षण आज, रविवारी व २७ एप्रिल रोजी आयोजित केले होते. मात्र सध्या काेरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र इयत्ता दहावी व बारावीचे ऑनलाईन तास सुरू आहेत. पाचवी ते नववी व अकरावीचे निकाल तयार करण्याचे काम सुरू असल्याने शिक्षकांमधून याबाबत नाराजीचा सूर होता. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करून तालुकास्तरावरील महसूल यंत्रणा कामकाजासाठी घेण्याचे आदेश वैभव नावडकर यांनी दिले. त्यांचे प्रशिक्षण ऑनलाईन घेण्यात येणार आहे.
दरम्यान, ‘गोकुळ’साठी मंगळवार (दि. २०) माघारीचा अखेरचा दिवस आहे. संघाच्या २१ जागांसाठी बारा तालुक्यातील ३५ केंद्रावर २ मे रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होत आहे.