कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूरचे भूषण आहे. येथे सर्वतोपरी सोईसुविधा निर्माण करून नाट्यचळवळीला प्रोत्साहन देऊ; त्यासाठी दर महिन्याला आढावा बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवारी दिली.येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात ‘५९ व्या राज्य नाट्य स्पर्धे’च्या प्राथमिक फेरीच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी व ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल वेल्हाळ तसेच ज्येष्ठ लेखक लक्ष्मण द्रविड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.नाट्यगृहातील गैरसोर्इंबाबत डॉ. कलशेट्टी म्हणाले, ‘नाट्यगृहात काही प्राथमिक सुविधा नव्हत्या. त्यावर आम्ही तत्काळ बैठक घेतली आणि स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पिण्याचे पाणी, वातानुकूलित यंत्रणा अशा सुविधा लगेच पुरविल्या. यापुढेही आयुक्त म्हणून मी स्वत: नाट्यगृहाच्या कामात लक्ष घालेन व सर्व सोईसुविधा पुरविल्या जातील; त्यासाठी दर महिन्याला आढावा बैठक घेतली जाईल. नवीन उपक्रमातून नाट्य चळवळीला प्रोत्साहन दिले जाईल.यावेळी स्पर्धेचे परीक्षक प्रा. मधू जाधव (अकोला), मुकुंद हिंगणे (सोलापूर), गौरी लोंढे (पिंपरी चिंचवड) यांच्यासह अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, स्पर्धा समन्वयक प्रशांत जोशी, मिलिंद अष्टेकर उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटन सत्रानंतर यशोधरा पंचशील अकॅडमी संस्थेच्या ‘थिंक पॉर्इंट’ या नाटकाने रंगमंचाचा पडदा उघडला. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन लक्ष्मण द्रविड यांनी केले आहे.