कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना पुन्हा एकदा गांजा पुरविण्याचा प्रयत्न झाला. तेथील सुरक्षा व्यवस्था पुन्हा चव्हाट्यावर आली. चारचाकी वाहनातून दोघा अज्ञातांनी संरक्षक भिंतीवरून तीन गठ्ठे कारागृहात फेकल्याचा प्रकार सोमवारी (दि. २१) मध्यरात्री घडला. पहाटेच्या सुमारास कारागृहातील सुरक्षारक्षकांनी सापडलेले संबंधित कापडी गठ्ठे ताब्यात घेतले. तिन्हीही गठ्ठ्यांतील एकूण पाऊण किलो गांजा, दहा मोबाईल संच, दोन पेन ड्राईव्ह, पाच चार्जिंग कॉड, एमसीलच्या पाच पुड्या असा सुमारे १५ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत जुना राजवाडा पोलिसांत अज्ञात दोघांविरोधात गुन्हा नोंदविला.
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोल्हापूर ते गारगोटी मार्गावरील तटबंदी क्र. १ कडील कारागृहाच्या आतील बाजूस अज्ञाताने फेकलेले कापडाचे गुंडाळलेले तीन गठ्ठे रवींद्र भाट (रा. चांदेकरवाडी, ता. राधानगरी) या सुरक्षा कर्मचाऱ्यास पहाटे सापडले. त्यावर ‘व्हीसील’ असे मराठीत लिहिले होते. त्यांनी तातडीने ते गठ्ठे ताब्यात घेतले. त्यांनी त्याची कल्पना कारागृह अधीक्षक शरद शेळके यांना दिली. प्रत्येक गठ्ठ्यात कमी-जास्त प्रमाणात गांजा, मोबाईल संच, एमसीलची पाच पाकिटे, आदी सुमारे १५ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल आढळला. मोबाईल व गांजा कैद्यांसाठी पुरवण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.
कापडात गुंडाळला गांजा
गांजा, मोबाईल संच, चार्जिंग कॉड, पेन ड्राईव्ह हे साहित्य तिन्हीही गठ्ठ्यांत आढळले. साहित्य कापडात व प्लास्टिक आवरणाने चिकटवून चिकटटेपने गठ्ठा केला होता. तीन गठ्ठे कारागृहाच्या सुरक्षा भिंतीवरून आत फेकले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चारचाकी, तरुण कैद
हे साहित्य मिळाल्याने सतर्क झालेल्या सुरक्षा यंत्रणेने कारागृह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी वाहन कोल्हापूरच्या दिशेने आले, त्यातूृन दोन तरुण उतरून ते फूटपाथवर चढले, त्यांनी हातातील तीन गठ्ठे कारागृहाच्या भिंतीवरून आत फेकले. त्यानंतर तातडीने वाहनात बसून पुन्हा कळंब्याच्या दिशेने निघून गेले. दरम्यान, हे वाहन पुढे साई मंदिरामार्गे पुन्हा यू टर्न घेऊन देवकर पाणंदच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून येत आहे. त्या दृष्टीने पोलीस त्या वाहनाचा शोध घेत आहेत.
सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर
दीड महिन्यापूर्वी कळंबा कारागृहात कैद्यांना गांजा पुरविण्यासाठी तो बॉलमध्ये भरून तटबंदीवरून कारागृहात फेकण्याचा प्रयत्न झाला. त्या प्रकरणी पुण्यातील तिघांना अटक झाली होती. त्यानंतर कारागृहात मोबाईल संचही सापडले आहेत.