कोल्हापूर : पाचगाव, पोवार कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक किरण बापूसाहेब ढेंगे यांचे एटीएम सेंटरवरून निघालेले, परंतु त्यांना न मिळालेले १० हजार रुपये स्टेट बँकेच्या जरगनगर शाखेने त्यांच्या खात्यावर यापूर्वीच जमा केल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. ढेंगे यांच्या पेन्शन खात्यातून ही रक्कम काढण्यात आली होती; त्यामुळे ते याच खात्यावरील व्यवहार तपासत राहिले आणि बँकेने त्यांच्या बचत खात्यावर ही रक्कम जमा केल्याचे त्यांना माहीत नव्हते. ही रक्कम जमा झाल्याचे समजताच त्यांचा जीव भांड्यात पडला.
ढेंगे मूळचे भुदरगड तालुक्यातील मडिलगेचे. ते येथील पोवार कॉलनीत राहतात. २० मे रोजी सकाळी ९.२० वाजता त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवरून १० हजार रुपये काढले; परंतु मशीन स्लो असल्याने पैसे येण्यास विलंब झाला. पैसे निघाले नाहीत असे वाटल्याने ते निघून गेले. ही रक्कम त्यानंतर त्या एटीएममध्ये गेलेल्या सचिन दीपक लोंढे या तरुणास मिळाली. त्याने ती प्रामाणिकपणे बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत जमा केली; परंतु ती मिळविताना ढेंगे यांना बराच मनस्ताप झाला. त्यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. नेमके हे पैसे का मिळत नाहीत, अशी चौकशी ‘लोकमत’ने स्टेट बँकेकडे केल्यावर त्यांनी हे पैसे यापूर्वीच जमा केले असल्याचे सांगितले. ढेंगे यांचे नियमित खाते सोडून दुसऱ्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्याने त्यांचेही हेलपाटे झाले व पैसे मिळाले नाहीत म्हणून मनस्तापही. स्टेट बँकेने या प्रकरणी बँक ऑफ इंडियाशी वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून ढेंगे यांची रक्कम कशी देता येईल, असे प्रयत्न माणुसकीच्या भावनेने केल्यामुळेच ही रक्कम त्यांना परत मिळू शकली.