लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वर्षभरात पोलीस दप्तरी बेपत्ता नोंद झालेल्यांमध्ये ३२ टक्के प्रमाण हे मुलींचे आहे. बहुतांशी मुली या प्रेमप्रकरणातून रफूचक्कर झाल्या; पण काही दिवसांनी घरी न जाता नियोजनबद्ध थेट पोलीस ठाण्यात पतीसह लग्नाचे फोटो व प्रमाणपत्रच घेऊन परतल्याच्या घटना घडल्या. वर्षभरात जिल्ह्यातून सुमारे १७३ व्यक्ती बेपत्ताची पोलिसांत नोंद आहे. त्यापैकी १०७ जणांना शोधण्यात पोलीस यंत्रणेला यश आले. अद्याप ६६ जणांचा सुगावा लागलेला नाही.
जिल्ह्यात २०१९ मध्ये १८८ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्या तुलनेत २०२० मध्ये बेपत्ता व्यक्तींची संख्या १५ ने घटली. लॉक-अनलॉकमध्ये नागरिकच घरात राहिल्याने बेपत्ताचे प्रमाण कमी झाले. बेपत्ता व्यक्तींची पोलिसांत वारसांनी नोंद केल्यानंतर त्यांचे फोटो, वर्णन व माहिती नियंत्रण कक्षामार्फत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांकडे पाठविली जाते व त्यातून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न असतो. काहीवेळा बेवारस मृतदेहातूनही बेपत्ता व्यक्तींचा उलगडा झाला. लॉकडाऊन, संचारबंदी, बंदोबस्तामुळे यावर्षी बेपत्ता व्यक्तींना शोधण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळच मिळाला नाही. अल्पवयीन मुलींचेही बेपत्ता होण्याचे वाढते प्रमाण पालकांना चिंताजनक ठरत आहे.
रागाच्या भरात बेपत्ताचे प्रमाण अधिक
अनेकजण रागाच्या भरात घरातून निघून गेले. काही प्रेमप्रकरणाचा आधार घेऊन बेपत्ता झाले, तर काही वयोवृध्द असल्याने ते बेपत्ता झाल्याच्या नोंदी आहेत. वयात आलेल्या मुलांना आता रागाने बोलल्याचे सहन होत नाही. ही मुले रागाच्या भरात घर सोडून गायब होण्याची, पण नंतर राग उतरल्यानंतर परतल्याची संख्याही मोठी आहे.
लॉक-अन्लॉकचा परिणाम
कडक लॉकडाऊनच्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांत नागरिकांना संचारबंदीत घरातून बाहेर पडणे प्रतिबंध असतानाही ३५ जण बेपत्ता झाल्याची पोलिसांत नोंद आहे. पण अनलॉक प्रक्रियेनंतर हे बेपत्ताचे प्रमाण वाढले.
पॉईंटर..
वर्ष - बेपत्ता- सापडले
२०१९ - १८८ - १४६
२०२० - १७३ - १०७
महिना - बेपत्ता- सापडले
जानेवारी - १६ - १०
फेब्रुवारी - २६ - २०
मार्च - ०९- ०५
एप्रिल - ०५ - ०२
मे - ०८ - ०५
जून - १२ - ०५
जुलै - २१ - १९
ऑगस्ट - १४ - ०८
सप्टेंबर -१९ - १०
ऑक्टोबर - १५- ०८
नोव्हेंबर - १५ - ०८
डिसेंबर - १३ -०७