कोल्हापूर : जिल्ह्यातील दूध उत्पादकाच्या घामाला दाम देण्याबरोबरच ‘गोकुळ’चे शिल्पकार आनंदराव पाटील-चुयेकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही रिंगणात उतरलो असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरला दोन रुपये जास्त देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे दिली.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत विरोधी ‘राजर्षी शाहू आघाडी’ची घोषणा शासकीय विश्रामगृहात करण्यात आली. यावेळी या आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आघाडीची भूमिका स्पष्ट करण्यात आली. पालकमंत्री पाटील म्हणाले, गोकुळमधील कारभार शेतकरी हिताचा व्हावा यासाठीच आम्ही गेली काही वर्षे संघर्ष करत आलो आहोत. त्यास यानिवडणुकीत हमखास यश मिळेल. सत्ता मिळाल्यावर आम्ही लिटरला दोन रुपये जास्त दर देऊ.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शेणामुतात राबणाऱ्या आमच्या आया-बहिणींच्या घामाला किंमत मिळवून देण्यासाठी आम्ही आघाडी केली आहे. ‘अमूल’प्रमाणे ‘गोकुळ’चा ब्रॅण्ड देशभर व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. आमच्या प्रयत्नांना विश्वास पाटील, अरुण डोंगळे, जयश्री पाटील-चुयेकर व सत्यजित पाटील-सरूडकर यांच्यामुळे बळ मिळाले. एक वेळ सत्ता देऊन बघा हाडाचे काडे आणि रक्ताचे पाणी करून ‘गोकुळ’चा सन्मान जोपासून तो वाढवला जाईल.
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो आहोत, त्यामुळे आमचा विजयी निश्चित आहे. खासदार संजय मंडलिक म्हणाले, पाच वर्षे आम्ही उत्पादकांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला. हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आघाडीला सभासद निश्चित पाठबळ देतील.
आमदार विनय कोरे, सत्यजित पाटील-सरूडकर, चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, विजय जाधव, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, जयवंत शिंपी, शशिकांत पाटील चुयेकर, गोपाळराव पाटील आदी उपस्थित होते.
चुयेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करूनच घोषणा
शासकीय विश्रामगृहात विरोधी पॅनलची घोषणा करण्यापूर्वी संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पॅनलच्या बॅनरवरही चुयेकर यांची प्रतिमा आहे.
‘गिला है ना शिकवा है’
आम्ही सत्तारूढ गटावर आताच टीका टिपणी करणार नसल्याचे सांगत मंत्री मुश्रीफ यांनी ‘गिला है ना शिकवा है’ सा शेर सांगून सत्तारूढ गटाबाबतची दिशा स्पष्ट केली.
मल्टिस्टेटच्या मुद्द्यापासून घेतली फारकत
गेल्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत केलेल्या मदतीचे वचन पाळण्यासाठी सत्तारूढ गटासोबत गेलो, हे जरी खरे असले तरी मल्टिस्टेटच्या मुद्द्यानंतर आपण त्यांच्याशी फारकत घेत सतेज पाटील यांच्यासोबत लढ्यात उतरलो. अरुण डोंगळे यांनी लेखीपत्र काढून मल्टिस्टेटला विरोध केलाच, पण संघाची गाडीही वापरण्यास नकार दिला, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
जयश्री चुयेकर यांचे भावनिक आवाहन
‘गोकुळ’ दूध संघ उभा करताना माझे पती आनंदराव पाटील-चुयेकर यांना काय त्रास झाला हे शब्दात सांगता येत नाहीत. सायकलवरून गावाेगावी फिरून दूध घालण्याचे आवाहन केले. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता प्रसंगी घरावर तुळशी पत्र ठेवून काम केले. अनेक वेळा राजकीय दबाव आला, अनेक संकटे उभी राहिली मात्र ते डगमगले नाहीत. रक्ताचे पाणी करून ‘गोकुळ’ची उभारणी करून लाखो दूध उत्पादकांच्या जीवना ‘आनंद’ फुलवला. त्यांच्या विचाराने वाटचाल करणाऱ्या राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा दिल्याचे ‘गोकुळ’च्या ज्येष्ठ संचालिका जयश्री पाटील-चुयेकर यांनी केले.