कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाक्षिक मूकनायकमधील ऐतिहासिक माणगाव परिषदेतील भाषण, छत्रपती शाहू महाराज यांचे भाषण व त्या परिषदेतील पारित झालेले पंधरा ठराव यांचे मूकनायक या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यामार्फत देशी व परदेशी भाषेत अनुवाद करून हा ऐतिहासिक दस्तऐवज या शताब्दी वर्षानिमित्त जगभरातील विचारवंत आणि अभ्यासकांना ग्रंथ रूपाने निर्मिती करून उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केली.
माणगाव परिषदेच्या १०१ व्या शताब्दी निमित्ताने सन्मान भूमी माणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांना शिवाजी विद्यापीठातर्फे शनिवारी अभिवादन करण्यात आले. माणगाव परिषद राष्ट्रीय स्मारक समितीचे अनिल कांबळे माणगावकर यांनी ग्रंथ निर्मितीची मागणी कुलगुरूंकडे केली. याचा संदर्भ घेत कुलगुरू शिर्के यांनी ग्रंथ निर्मितीची घोषणा केली.
यावेळी शिर्के म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाची घोषणा साक्षात राजर्षी शाहू महाराजांनी माणगाव परिषदेत केली. पुढे डॉ. आंबेडकरांनीही महाराजांचे भाकीत प्रत्यक्षात उतरविले. त्या दृष्टीने माणगाव परिषद ऐतिहासिक महत्त्वाची ठरते. या परिषदेची सविस्तर माहिती बाबासाहेबांच्या ‘मूकनायक’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यामुळेच आपल्याला मिळू शकली. या परिषदेची ही माहिती विविध भाषिक वाचकांना मिळायला हवी, यासाठी विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने या वार्तांकनाचे विविध भारतीय व परदेशी भाषांत अनुवाद करण्याचा प्रकल्प तातडीने हाती घेण्यात येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी शताब्दी वर्षानिमित्ताने विद्यापीठाने चर्चासत्र, व्याख्यानांचे आयोजन केल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित सर्वांनी स्मारक, लंडन हाऊस, होलोग्राफिक शो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुक्कामाची पुनीत झालेली कागल जहागिरीतील शाळा इमारत यांना भेट देऊन पाहणी करून समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे डॉ. एस. एस. महाजन, जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर, बौद्ध समाजाचे अध्यक्ष अरुण शिंगे, शिरीष मधाळे, नाना बिराजे, भिकाजी शिंगे, श्रीकांत चव्हाण, पांडुरंग कांबळे, भीमराव कांबळे, सुधाकर कांबळे, योगेश सनदी, आदी उपस्थित होते. आभार नंदकुमार शिंगे यांनी मानले.
फोटो: २००३२०२१-कोल-माणगाव विद्यापीठ
फोटोओळ : माणगाव परिषदेच्या १०१ व्या शताब्दी निमित्ताने शनिवारी माणगाव (ता. हातकणंगले) येथे छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिवाजी विद्यापीठातर्फे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी अभिवादन केले.