कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील ‘आयआरबी’ कंपनीने केलेल्या प्रत्येक कामाचा दर्जा तपासून, इंजिनिअरिंग व आर्किटेक्ट असोसिएशनच्या मदतीने नव्याने मोजमापे घेऊन फेरमूल्यांकन करण्याच्या कामास आज, बुधवारपासून सुरुवात होत आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) सहव्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ मूल्यांकन समितीच्या मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत ‘नोबल इंटरेस्ट कन्सलटन्सी इंजिनिअर्स’ या कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला. ‘नोबल’ येत्या २५ दिवसांत प्रकल्पाची किंमत ठरवून त्याचा अहवाल सादर करणार असल्याची माहिती शहर अभियंता तथा समिती सदस्य नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.राज्य सरकारने १ जून २०१५ पासून कोल्हापूर टोलमुक्त होणार असल्याची घोषणा केली आहे. प्रकल्पाचे ‘आयआरबी’ला पैसे कशाप्रकारे भागवायचे याचे अनेक पर्याय सरकारपुढे आहेत. महापालिकेला दीर्घ मुदतीने कर्ज देणे, टेंबलाईवाडी येथील ‘आयआरबी’ला दिलेल्या भूखंडाचे बाजारभावाप्रमाणे मूल्य ठरवून त्याचे पैसे प्रकल्पातून वजा करणे, इतर भूखंड देऊन ‘आयआरबी’चे पैसे वळते करणे, आदी पर्यायांवर सरकार विचार करत आहे. तत्पूर्वी, प्रकल्पाची नेमकी किंमत ठरविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने प्रकल्पाचा नेमका खर्च ठरविण्याच्या कामास सुरुवात केली आहे.या उपसमितीच्या मुंबईत ‘एमएसआरडीसी’च्या कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रकल्पाचा खर्च ठरविण्यासाठी एजन्सी नेमण्यासाठी मागविलेल्या निविदेला टेक्नोजेन कन्सलटन्सी, जे. पी, इंजिनिअरिंग, ‘नोबल’, आदी कंपन्या पात्र ठरल्या. त्यापैकी ‘नोबल’ला १४ लाख ३४ हजार रुपयांत प्रकल्पाचे पुनर्मूल्यांकन करण्याचा ठेका मंजूर करण्यात आला. बैठकीवेळी कोल्हापूर आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक वास्तुविशारद राजेंद्र सावंत, अध्यक्ष संतोषकुमार, समिती सदस्य वास्तुविशारद रामचंदानी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ओहोळ व सहायक कार्यकारी संचालक प्रकाश खेमचंदानी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पूर्वी केलेल्या सर्वेक्षणाचा आधार न घेता नव्याने सर्वांसमक्ष सर्वेक्षण होणार आहे. मूल्यांकनानंतर प्रकल्पाची मूळ किंमत ठरेल. ‘नोबल’ला मंगळवारी पुण्यातील ‘एमएसआरडीसी’च्या कार्यालयात ‘वर्क आॅर्डर’ देण्यात आली. मूल्यांकनाच्या कामावर महापालिका, अर्किटेक्ट असो. व ‘एमएसआरडीसी’चे पथक लक्ष ठेवणार आहे. शहरात एकाच वेळी चार ठिकाणी या कामास सुरुवात होईल. - नेत्रदीप सरनोबत, समिती सदस्यअसे होणार मूल्यांकनसंपूर्ण प्रकल्पाची लांबी व रुंदी तपासणाररस्त्यांची पातळी, काँक्रिटसह इतर कामांची शास्त्रीय तपासणी होणारकरारात नमूद केल्याप्रमाणे कामे झाली किंवा नाही याची पाहणी४अपूर्ण कामांचा तपशील व किंमत
रस्ते प्रकल्पाचे आजपासून फेरमूल्यांकन
By admin | Published: April 22, 2015 12:17 AM