गडहिंग्लज : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने चतुर्थ श्रेणी कर्मचारी वेतनश्रेणी काढून त्या ठिकाणी भत्त्यावरील नेमणुका करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी चंदगड तालुका माध्यमिक खासगी शाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन चंदगडचे आमदार राजेश पाटील यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे, चतुर्थ कर्मचाऱ्यांची भत्त्यावर नेमणूक करणे हा निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण चांगले व्हावे यासाठी कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. त्यांची वेतनश्रेणी बंद करून भत्त्यावर नेमणूक करणे म्हणजे त्यांचा घटनात्मक अधिकार नाकारल्यासारखे आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच वेतनश्रेणीनुसार नियुक्ती करण्याची कायदेशीर तरतूद कायम ठेवावी, अन्यथा कामबंद आंदोलन केले जाईल.
निवेदनावर, संघटनेचे कार्याध्यक्ष अजित गणाचारी, चंदगड तालुकाध्यक्ष आप्पाण्णा चिंचणगी, गडहिंग्लज तालुका सचिव आशपाक मुरसल, आजरा तालुका सचिव गोपाळ गडकरी, दीपक कांबळे, पांडुरंग कांबळे, रियाज कादरभाई, जगन्नाथ वगरे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.