कोल्हापूर : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात उद्योगपतींच्या खिशातील सरकार असून ज्या दिवशी शेतकरी, मजुरांच्या हातात सत्ता येईल, त्याच दिवशी देशात क्रांती होईल, असे प्रतिपादन गुजरात काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी केले.डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, राज्य शासन कृषी विभाग, आत्मा व कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्या वतीने तपोवन मैदान येथे आयोजित ‘सतेज कृषी प्रदर्शन’च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते.आमदार मेवानी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हे प्रयोगशील आहेत. येथील शेती व दुग्ध व्यवसायातील तंत्रज्ञान गुजरात राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल, ‘गोकुळ’कडून खूप शिकण्यासारखे असून त्यासाठी आपण प्रयत्नशील आहे.आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञान अवगत करत उत्पादकता दुप्पट करावी. केंद्रातील सरकारचे धोरण पाहिले तर नोकऱ्या मिळणार नसल्याने तरुणांनी आधुनिक शेतीची कास धरून सक्षम व्हावे.आमदार सतेज पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना एकाच छताखाली आधुनिक तंत्रज्ञान मिळणार असून ते आत्मसात करुन उत्पादकता वाढवावी. जिल्ह्यात ९२ टक्के अल्पभूधारक शेतकरी असून कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्याचे सूत्र येथे शेतकऱ्यांना मिळणार आहे. विनोद पाटील यांनी स्वागत केले. प्राचार्य महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार प्रा. जयंत आसगावकर, जयश्री जाधव, के. पी. पाटील, बजरंग देसाई, सुरेश साळाेखे, संजय पवार, विजय देवणे, राजीव आवळे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, तेजस सतेज पाटील, मुरलीधर जाधव, सचिन चव्हाण, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, ‘रामेती’चे प्राचार्य उमेश पाटील, डॉ. अशोक पिसाळ, जालंदर पांगरे आदी उपस्थित होते.मुश्रीफ यांचा विजय हेच शाहूंचे विचारएकीकडे शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न सुरू असताना हसन मुश्रीफ यांच्यासारखा अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती गेली २५ वर्षे आमदार म्हणून निवडून येत आहेत, हे फक्त कोल्हापुरातच घडू शकते. हेच राजर्षी शाहू महाराजांचे विचार असल्याचे आमदार मेवानी यांनी सांगितले.‘डी. वाय.’ यांचा वारसा ‘सतेज’ यांनी चालवलाडॉ. डी. वाय. पाटील यांचे नाव गुजरातमध्ये उच्चारले की शैक्षणिक संकुल डोळ्यासमोर येते. त्यांचा शैक्षणिक व विचारांचा वारसा सतेज पाटील यांनी सक्षमपणे पुढे ठेवल्याचे गौरवोद्गार आमदार मेवानी यांनी काढले.
शिरोळचे शेतकरी हुशारजिल्हा बँक पाच लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज देत असल्याचे सांगत, हेच पैसे ८ टक्क्यांनी बँकेत ठेवले तर वार्षिक ४० हजार व्याज मिळते. याबाबत शिरोळचे शेतकरी फार हुशार असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.