कोल्हापूर : फ्रेंच राज्यक्रांतीचा रक्तरंजित प्रवास मांडणाऱ्या ऱ्हासपर्व नाटकाच्या हाऊसफुल्ल प्रयोगाने शनिवारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित ज्येष्ठ नाट्यवितरक मनोहर कुईंगडे नाट्य महोत्सवाची सांगता झाली. यानिमित्ताने पुन्हा एकदा केशवराव भोसले नाट्यगृह रसिकांच्या गर्दीने फुलले.
परिवर्तन कला फाउंडेशनच्या टीमने प्रयोग सादर केला. यावेळी निर्माते दिलीप जाधव यांनी कोल्हापूर शाखेने केलेला उपक्रम स्तुत्य असून, ‘ऱ्हासपर्व’ नाटकाचे प्रयोग राज्यभर होण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी स्थानिक नाट्य परिषद शाखांची मदत घेतली जाईल, असे सांगितले. फ्रान्सचा राजा लुई सोळावा आणि राणी मारिया यांच्या राजेशाहीविरुद्ध निर्माण झालेल्या जनक्षोभातून राजा आणि राणीवर टोकाच्या टीका होतात. त्याला कंटाळून राजा लुई राजेपदाचाच त्याग करतो आणि पत्नी व मुलांसह ऑस्ट्रियाला जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तो अयशस्वी ठरतो. त्याच्यावर खटला भरला जातो. पुढे राजा व राणीसह त्यांच्या हस्तकांचा गिलोटीनखाली शिरच्छेद करून राजेशाही संपुष्टात आणली जाते व नेपोलियनची हुकूमशाही प्रस्थापित होते. असा हा फ्रान्स राज्यक्रांतीचा रक्तरंजित प्रवास नाटकातून घडतो. दरम्यान, प्रसिद्ध निर्माते दिलीप जाधव, सुभाष गुंदेशा, नाट्य परिषदेचे शाखा अध्यक्ष आनंद कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह गिरीश महाजन, जयश्री नरके, आदी उपस्थित होते. हेमसुवर्णा मिरजकर यांनी स्वागत केले.
---
फोटो नं १३०३२०२१-कोल-केशवराव०१
ओळ : कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने आयोजित नाट्य महोत्सवाची सांगता शनिवारी ‘ऱ्हासपर्व’ या नाटकाने झाली.
--
०२
यानिमित्ताने पुन्हा एकदा केशवराव भोसले नाट्यगृह रसिकांच्या गर्दीने फुलले.
--