कोल्हापूर : वैद्यकीय अभ्याक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत ताराबाई पार्क येथील रिभव विलास जाधव याने ७२० पैकी ६४९ गुणांची कमाई करत कोल्हापूर शहरात गुरुवारी (दि. १५) प्रथम क्रमांक पटकविला. त्याने पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. या परीक्षेत कळंबा (ता. करवीर) येथील साक्षी सुनील महाडेश्वर हिने ५६२ गुणांसह यश मिळविले आहे. तिचे पर्सेंटाईल ९७ टक्के इतके आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील विविध २८ केंद्रांवर दि. १३ सप्टेंबर रोजी सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. त्यामधील रिभव याने बाजी मारली आहे. त्याचे एकूण पर्सेंटाईल ९९.६९ टक्के असून त्यात फिजिक्ससाठी ९९.६ टक्के, केमिस्ट्रीला ९९.०६ टक्के, तर बायोलॉजीला ९९.८३ टक्के गुण आहेत. त्यांची ऑल इंडिया रँक ४०२४ अशी आहे. त्याने अतिग्रे येथील संजय घोडावत आयआयटी ॲड मेडिकल अकॅडमीच्या माध्यमातून या परीक्षेची तयारी केली.
गेली सहा महिने त्याने रोज १० ते १४ तास अभ्यास करून यश मिळविले आहे. त्याला अकॅडमीचे कोंडुती श्रीनिवास (वासू), श्रीधर गुप्ता, कोल्हापुरातील आर. एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. रिभव हा मुलांचे मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. विलास जाधव आणि आहारतज्ज्ञ डॉ. शिल्पा जाधव यांचा चिरंजीव आहे. दरम्यान, त्याने दहावीमध्ये ९५ टक्के, तर बारावीला ८५ टक्के गुण मिळविले होते. नीट परीक्षेतही त्याने कोल्हापूर शहरात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.
अभ्यासातील सातत्य आणि शिक्षक, आई, वडील, बहीण आर्या यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर यश मिळविले आहे. पहिल्यात प्रयत्नात यश मिळविल्याचा खूप आनंद होत आहे.- रिभव जाधव