भुदरगड तालुक्यातील पूर्वभागात भात पेरणीची लगबग सुरू आहे. गेली दोन दिवस पावसाने उसंत दिल्याने माळरानात पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मान्सून वेळेत हजर होणार असल्याने बळिराजाची पेरणीची धांदल उडाली आहे.
दरवर्षी तालुक्याच्या पूर्व भागात १५ मे नंतर भात पीक पेरणीच्या धांदलीस सुरुवात होते, तर पश्चिम भागात रोप लागण करण्यात येते. त्यामुळे पश्चिम भागात शेतीची इतर मशागतीची कामे सुरू झाली आहेत. पूर्वेला मात्र पेरणीसाठी धांदल उडाली आहे. गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने यंदा भात पेरणीला उशीर झाला आहे. माळरान परिसरास पेरणीची घात असली तरी काळवट शेतं पावसाच्या पाण्याने भरून गेली आहेत.
मागील आठवड्यात वादळ व पावसामुळे उन्हाळी पीक काढणी खोळंबली. गेली चार दिवस पावसाने उसंत दिल्याने बळिराजा माळरान शेतीच्या भात पेरणीच्या कामात गुंतला आहे, पण कळवट जमिनीच्या घातीबाबत शेतकरी चिंतेत आहे. सर्वत्र भातपीक पेरणीच्या कामास सुरुवात झाल्याने माळशेत फुलून गेला आहे.
फोटो :
निळपण : मडिलगे बुद्रुक येथील शेतकरी बैलाच्या मदतीने कुरीने भात पेरणीत मग्न.