आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0८ : येथील युवा चित्रकर्ती रिचा वोरा हिच्या कलाकृतींचे ‘द ओन्ली विंडो ओपन इनवर्ड’ हे प्रदर्शन सोमवारपासून लंडनमधील नेहरू सेंटरमध्ये सुरूझाले आहे. तिच्या एकूण बावीस कलाकृतींचा प्रदर्शनात समावेश असून, १९ तारखेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
कलानिकेतन महाविद्यालयातून प्लाईट आर्ट डिप्लोमा पूर्ण केलेल्या रिचाच्या कलाकृतींची एकल व समूह प्रदर्शने झाली आहेत. विवाहानंतर रिचा लंडनमध्ये स्थायिक झाली असली तरी तिने आपला चित्राविष्कार सुरूच ठेवला आहे. या प्रदर्शनात तिने भारतातील विविध ठिकाणे, झाडे, जंगल, सरोवर या निसर्गावर आधारित कलाकृती मांडल्या आहेत.
दरम्यान, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमातून भारतीय आणि ब्रिटिश सांस्कृतिक आदान-प्रदानाचे उपक्रम नेहरू सेंटरमध्ये सातत्याने घेतले जातात. त्यात आजवर अनेक दिग्गज भारतीय कलाकारांनी हजेरी लावली आहे. येथे प्रदर्शन भरविणारी रिचा ही कोल्हापूरची पहिलीच युवा चित्रकर्ती असून, तिच्या निमित्ताने कोल्हापूर स्कूल लंडनमधील नेहरू सेंटरमध्ये झळकले आहे. लंडनमधील विविध कलाकृतींमध्ये युरोपियन स्टाईल मोठ्या प्रमाणावर दिसते. किंबहुना त्याला अधिक पसंती मिळते. या पार्श्वभूमीवर भारतीय चित्रशैलीचा आविष्कार प्रदर्शनात मांडला आहे.