कोल्हापूर : शहरातील खराब रस्ते तातडीने करण्याच्या मागणीसाठी जिल्हा वाहनधारक महासंघाने शुक्रवारी ऐतिहासिक दसरा चौक ते महापालिका असा रिक्षासह मोर्चा काढला. महापालिका चौकात मोर्चा आल्यानंतर सुमारे दोन तास ‘रास्ता रोको’ आंदोलनही करण्यात आले. यावेळी गरज असणारे रस्ते केले जात नसल्यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी करण्यात आली.कोल्हापूर जिल्हा वाहनधारक संघटनेने शहरातील खराब रस्त्यांसंदर्भात गेल्या महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी १५ दिवसांत रस्ते करण्याची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात कार्यवाही झाली नसल्यामुळे वाहनधारक महासंघाने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, सभागृह नेते दिलीप पोवार यांना वाहनधारक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी वाहनधारक संघटनेचे चंद्रकांत भोसले, अभिषेक देवणे, राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, दिलीप सूर्यवंशी, दिनमहमंद शेख, नीलेश हंकारे, पुष्पक पाटील, इंद्रजित आडगुळे, वसंत पाटील, संजय केसरकर, अतुल माळकर, उदय गायकवाड, दीपक पोवार उपस्थित होते.