कोल्हापूर : सेवा इंटरनॅशनल या संस्थेमार्फत कन्याकुमारीहून निघालेल्या रिक्षा रनचे स्वागत सोमवारी शिवाजी विद्यापीठात कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. चार देशांतील ९0 व्यक्तींचा या रिक्षा रनमध्ये सहभाग आहे. कर्नावती (अहमदाबाद) येथे सांगता होणाऱ्या या रिक्षा रनद्वारे देशभरातील विविध दिव्यांग प्रकल्पांना या व्यक्ती भेट देणार आहेत.या व्यक्तींनी आतापर्यंत १५२0 किलोमीटरचा प्रवास या रिक्षाद्वारे केला आहे.कोल्हापूरातील समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) आणि इतर संस्थांमार्फत देशभर चालणाºया विविध दिव्यांग प्रकल्पांतील कामाची माहिती घेण्यासाठी तसेच दिव्यांग समुदायांबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने सेवा इंटरनॅशनलमार्फत १0 डिसेंबर रोजी कन्याकुमारीहून निघालेली ही रिक्षा रन सोमवारी कोल्हापूरात आली. शिवाजी विद्यापीठात सक्षमच्या कोल्हापूर शाखेमार्फत या रिक्षा रनचे स्वागत करण्यात आले.शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर विविध ३0 रिक्षांमधून आलेल्या व्यक्तींचे स्वागत कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.या रिक्षा रनमध्ये सहभागी झालेल्या सेवा इंटरनॅशनल युकेच्या प्रतिनिधी हरिषभाई, भारतभाई, विपुल, समीर, विकास, विराल, अमित, व्हिक्टोरिया यांनी प्रारंभी शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करुन पुष्पार्पण केले.यावेळी कुलसचिव विलास नांदवडेकर, प्रकुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, शिवाजी विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या प्रमुख डॉ. अंजली निगवेकर, शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य अमित कुलकर्णी, यांच्यासह कोल्हापूरातील समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम)चे अध्यक्ष गिरिश करडे, डॉ. चेतन खारकांडे, सक्षमचे अस्थिव्यंग विभाग प्रमुख विवेक मोरे, भक्ती करकरे, डॉ. शुभांगी खारकांडे, सारिका करडे, विनोद पालेशा, अजय मणियार, आदी मान्यवर उपस्थित होते.कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी या रिक्षा रनमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींचे स्वागत करुन या उपक्रमाचे कौतुक केले. शिवाजी विद्यापीठातही दिव्यांगांचा सन्मान होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कुलगुरुंच्या हस्ते या यात्रेत सहभागी झालेल्यांना द ग्रेट शिवाजी या पुस्तकांचे तीन खंड आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. सेवा इंटरनॅशनल युकेमार्फतही कुलगुरुंना दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या रिक्षाच्या लाकडी प्रतिकृतीची भेट देण्यात आली. मुंबई सेवा इंटरनॅशनलचे मनिश तांडोल आणि रमेश सुब्रमण्यम यांनी या रिक्षा रनबद्दल माहिती दिली.१0 डिसेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरु झालेल्या या रिक्षा रनमध्ये युके, आॅस्ट्रेलिया, अमेरिका आणि केनिया या चार देशांतील १८ ते ७२ वयोगटातील ९0 व्यक्ती पाच राज्यातून स्वत: रिक्षा चालवत २५00 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत. यामध्ये २६ महिलांचाही सहभाग आहे. विशेष म्हणजे प्रवास पूर्ण झाल्यानंतर या ३0 रिक्षा गरीब व्यक्तींना चरितार्थासाठी चालविण्यासाठी भेट म्हणून देण्यात येणार आहेत. या रिक्षा रनची सांगता २१ डिसेंंबर रोजी कर्नावती (अहमदाबाद) येथे होणार आहे.असा आहे रिक्षा रनचा प्रवासआतापर्यंत या व्यक्तींनी रिक्षा स्वत: चालवत कन्याकुमारीहून मदुराई, कोईमतूर, म्हैसूर, शिमोगा, हुबळी, गोवा आणि कोल्हापूर असा प्रवास करुन १५२0 किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे. अद्याप पुणे, केशवसृष्टी,मुंबई, वापी, बडोदा आणि अखेरीस कर्नावती-अहमदाबाद असा ९३५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत.या दिव्यांग प्रकल्पांना देणार भेटीसेवा इंटरनॅशनल, भारत ही १९९७ मध्ये मुंबईत स्थापन करण्यात आलेली स्वयंसेवी संस्था आहे. ग्रामीण भागात सुरु असलेल्या अनेक दिव्यांग प्रकल्पांना या संस्थेमार्फत अर्थसहाय्य केले जाते. राज्यातील कोचेला, पुणे, जव्हार, लातूर तसेच कर्नाटकातील गदग आणि गोव्यातील दिव्यांगजणांसाठी उभारलेल्या प्रकल्पांनाही या रिक्षा रनमध्ये भेटी दिल्या जाणार आहेत.