कोल्हापूर : केंद्र सरकारच्या शुल्कवाढीच्या विरोधात मंगळवारी विविध रिक्षा-टॅक्सी संघटनांनी पुकारलेल्या संपाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील पंधरा हजारांहून अधिक रिक्षा व टॅक्सीचालक संपात सहभागी झाल्याने दिवसभर वाहतूक विस्कळीत झाली होती. सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही, तर आक्रमक आंदोलन करण्याची तयारी संघटनांनी केली आहे. सरकारने मोटार वाहन निमय १९८९ च्या नियमातील विविध कामकाजांचे शुल्क वाढण्याचा निर्णय डिसेंबर २०१६ मध्ये घेतल्याने रिक्षा व टॅक्सीचालकांची कुचंबणा होत आहे. ही शुल्कवाढ कमी करावी. पासिंग विलंबाबाबत रोज ५० रुपये दंड आकारला जात असून, तो पूर्ववत प्रतिदिनी ५ रुपये करावा, बँकांचा कर्जाचा बोजा चढविताना १५०० रुपये घेतले जातात त्याऐवजी १०० रुपये घ्यावे, रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, वाहतूक सेना, कोल्हापूर जिल्हा रिक्षा व्यावसायिक संघटना, भाजप रिक्षा संघटना, ताराराणी रिक्षा संघटना, कॉमन मॅन रिक्षा संघटना, काळी-पिवळी टॅक्सी संघटना, आदर्श युनियन, आदी संघटनांच्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून संप केला. मंगळवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात संघटनेच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. सरकारच्या धोरणांविरोधात घोषणा देण्यात आल्या. सोमवारी मध्यरात्रीपासून रिक्षा, टॅक्सी बंद केल्या. त्यात के.एम.टी. सेवाही नसल्याने रात्री उशिरा परगावाहून येणाऱ्या प्रवाशांची चांगलीच कुचंबणा झाली. सकाळी के.एम.टी.ने फेऱ्या वाढविल्या असल्या तरी वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्यवर्ती बसस्थानकावरून सुटणाऱ्या के.एम.टी. हाऊसफुल्ल दिसत होत्या. आंदोलनात महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत भोसले, महाराष्ट्र रिक्षा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जाधव, ‘मनसे’चे राजू जाधव, रिक्षाचालक-मालक संघटनेचे राजू शाहीद, वाहनधारक महासंघाचे भारत चव्हाण, ताराराणी रिक्षा संघटनेचे शंकर पंडित, महासंघ शहराध्यक्ष विजय जेधे, रेल्वेस्टेशन रिक्षा स्टॉपचे महादेव हेगडे, शाहूमिल चौक रिक्षा मित्र मंडळाचे सुभाष पाटोळे, आदी सहभागी झाले होते. केएमटीच्या संख्येत वाढसंपामुळे वाहतुकीची कोंडी होणार, यासाठी ‘के.एम.टी.’ने मंगळवारी चार जादा बसेत जोडल्या होत्या. त्यातील दोन शिवाजी पुतळा, तर दोन मध्यवर्ती बसस्थानक मार्गावर सोडण्यात आल्या होत्या. शिट्टी वाजलीच नाही...!मध्यवर्ती बसस्थानक हा नेहमी रिक्षांनी गजबजलेला असतो. येथे वाहतुकीचे नियंत्रण करताना दिवसभर शिट्ट्या वाजवून पोलिसांचा जीव मेटाकुटीला येतो; पण रिक्षांच्या संपामुळे एकदाही शिट्टी वाजवावी लागली नाहीआमच्या मागण्यांबाबत सरकारकडे प्रयत्न असून, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्या पोहोचविण्याचा प्रयत्न केला. एक दिवस संप करून सरकारला जागे केले आहे. सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आगामी काळात आक्रमक आंदोलन करू.- चंद्रकांत भोसले (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र वाहतूक सेना)
रिक्षा-टॅक्सीच्या संपाला प्रतिसाद
By admin | Published: February 01, 2017 12:02 AM