लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाविकास आघाडीच्यावतीने रिक्षा व्यावसायिकांना पंधराशे रुपये सानुग्रह अनुदानाचे ऑनलाईन अर्ज काँग्रेस कमिटीत भरले जात आहेत. रिक्षा व्यावसायिकांनी कमिटीत येऊन अर्ज भरावेत, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.
कोरोनाच्या काळात रिक्षा व्यावयासिक अडचणीत आले आहेत. त्यांना मदत म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पंधराशे रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनुदान ऑनलाईन थेट संबंधित रिक्षा व्यावसायिकांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. अनुदान मागणीचे अर्ज ऑनलाईन भरायचे असून, त्याचा प्रारंभ मंगळवारी काँग्रेस कमिटीत पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यासाठी रिक्षाचालकांनी वाहन क्रमांक, रिक्षाचे परमिट, आर.सी. बुक, लायसन्स, बँक पासबुक आणि आधार क्रमांक या आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष येऊन ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर संबंधित माहितीची पडताळणी झाल्यावर रिक्षाचालकांना खात्यात तात्काळ दीड हजाराची आर्थिक मदत जमा करण्यात येईल, अशी माहिती मंत्री सतेज पाटील यांनी दिली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, ॲड. गुलाबराव घोरपडे, दीपक थोरात, ऋषिकेश पाटील, विजयानंद पोळ, सरफराज रिकीबदार, सचिन चावरे, आनंदा करपे, अक्षय शेळके, उदय पवार, विनायक पाटील, सुदर्शन तुळसे, संजय वाईकर आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : महाविकास आघाडी सरकारच्यावतीने रिक्षा व्यावसायिकांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्याची काँग्रेस कमिटीत ऑनलाईन नोंदणीस मंगळवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते प्रारंभ झाला. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील उपस्थित होते. (फोटो-२५०५२०२१-कोल-कॉग्रेस कमिटी)