कोल्हापूर : अनोख्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधत सजविलेल्या घोड्यावरून येऊन शक्तिप्रदर्शनाने वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अरुणा माळी यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उन्हाचा तडाखा असूनही हातात पक्षाचे झेंडे खांद्यावर घेऊन कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. हलगीचा कडकडाट, कैताळआणि घुमक्याच्या वाद्यात ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली.बिंदू चौकात महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचारयात्रेला प्रारंभ झाला. पिवळा फेटा, नऊवारी भगवी साडी नेसून तसेच हातात राज्यघटना घेऊन उमेदवार डॉ. माळी घोड्यावर स्वार होऊन प्रचारयात्रेत सहभागी झाल्या होत्या.दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. यावेळी प्रचारप्रमुख डॉ. उदयसिंह देसाई, महिला आघाडीप्रमुख अस्मिता दिघे,डॉ. रेश्मा चव्हाण, आदी सहभागी झाले होते.डॉ. माळी यांनी माजी आमदार लक्ष्मण माने, अस्लम मुल्ला, शाहीर शेख, सुनील गोटखिंडे, इम्रान सनदी यांच्यासोबत जाऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे अर्ज दाखल केला.
माळींची घोड्यावरून सवारी, दाखल केली उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 1:03 AM