कोल्हापूर : डाव्यांनी वेळोवेळी बेइमानी केल्यानेच उजवे माजलेत. डाव्यांचे वलय नाहीसे झाल्यानेच उजव्यांनी मारलेल्या गोळ्यांनी हत्या होत आहेत, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी रविवारी व्यक्त केले. राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये आयोजित बहुभाषिक राष्ट्रीय परिषदेत ‘अभिव्यक्ती के सारे खतरे उठाने पडेंगे’ या विषयावर ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डाव्या विचारसरणीच्या व्यासपीठावरून खान यांनी डाव्यांच्या चुकीच्या मानसिकतेवर अतिशय जहाल शब्दांत प्रहार केला. खान म्हणाले, बहुतांश समाजवादी आणि डाव्या लोकांत ढोंगीपणा दिसतो. सत्तेच्या आणि खुर्चीच्या लालसेपोटी डावे तत्त्वे गुंडाळून ठेवून उजव्यांच्या वळचणीला गेल्याचा इतिहास आहे. ते विखुरले, विस्कळीत झाले. याउलट उजवे कट्टर राहिले. ते जात, धर्म, लिंग या अजेंड्यावर राजकारण आणि समाजकारण यशस्वी करीत राहिले. अशा टप्प्यात डाव्या विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येऊन चळवळ बळकट करणे गरजेचे होते. आता तरी डाव्यांनी कट्टर राहायला हवे. डावे मीच शहाणा आहे, असे समजत असतात. हे बदलायला हवे. जाहीर व्यासपीठावर बोलायचे एक आणि व्यवहारात वागायचे दुसरे, अशी प्रवृत्ती बंद करायला पाहिले. शाळेच्या दाखल्यात जात नोंद असते. कोणत्या जातीच्या लोकांची संस्था असते, त्यानुसार देवदेवतांच्या प्रतिमा त्या शाळेत लावलेल्या असतात. त्यामुळे सर्वच शाळा आणि शासन जातीयवादी आहेत. माणूस म्हणून नवी समाजव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. सर्व जाती सर्वश्रेष्ठ आहेत, असे म्हटल्यानंतर एक जात दुसऱ्यावर कुरघोडी करीतच राहील. प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, राज्यघटनेनुसार देश चालतो; धर्मसंसदेनुसार नाही, हे सांगण्याची वेळ आली आहे. राज्यकर्त्यांच्या भेकड, कचखाऊ भूमिकेमुळे अॅड. गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रा. कलबुर्गी अशा पृथ्वीमोलाच्या माणसांची हत्या होऊनही दोषींना कडक शासन होत नाही. अशा प्रकारे हत्या करून विवेकाचा गळा दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. महात्मा फुले यांनी मांडलेल्या समाजव्यवस्थेची अंमलबजावणी झाली पाहिजे. प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डी. सी. तुलशीकट्टी, डॉ. सिंधू आवळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मेघा पानसरे, डॉ. राजू पोतदार, वसंत पाटील, राजा शिरगुप्पे उपस्थित होते. कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे सचिव गणेश ठाकूर, डॉ. टी. एस. पाटील, आदी उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात डॉ. गजानन चव्हाण, राजा शिरगुप्पे, धनाजी गुरव तर तिसऱ्या सत्रात प्राचार्य आनंद मेणसे, डॉ. राजन राव, दादासाहेब सनदी, प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी मार्गदर्शन केले. शेवटी शाहीर आझाद नायकवाडी, गौतम कांबळे, थळेंद्र लोखंडे, बाबासाहेब नदाफ यांचा शाहिरी कार्यक्रम झाला. नामोल्लेख टाळून टीकाआंबेडकरांचा विचार सांगत राजकारण करणारे सत्तेसाठी ‘मातोश्री’वर लोटांगण घालतात. त्यावेळी त्यांच्यातील निष्ठा जाते कोठे, असा सवाल उपस्थित होतो, असा रामदास आठवले यांचा नामोल्लेख टाळून खान यांनी आरोप केला.
डाव्यांच्या बेइमानीमुळे उजवे माजले : राजन खान
By admin | Published: January 18, 2016 12:15 AM