कोल्हापूर : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी पावसाने जिल्हाभर रिमझीम हजेरी लावली. पावसात फारसा जोर नसलातरी दिवसभर हवेत गारवा कायम होता. दरम्यान पुढील आठवडाभर पावसाच्या अनियमिततेचा अनुभव येणार असून बऱ्यापैकी दडीच मारणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
कोल्हापुरात मागील आठवड्यात अक्षरश: वीट येइपर्यंत पाऊस पडल्यानंतर एकदम कडकडीत ऊन पडू लागल्याने बऱ्यापैकी व्यवहार सुरळीत होत होते. शिवारातही आंतरमशागतीच्या कामांनी वेग घेतला होता. पण बुधवारपासून परत काहीसा वातावरणात बदल जाणवत होता. दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, गुरुवारीदेखील अगदी सकाळपासून पावसाच्या किरकोळ सरींनी हजेरी लावली. त्यानंतर दिवसभर अधूनमधून भूरभूर सुरु राहिली. संध्याकाळपासून मात्र जोरदार सरी आल्या.
दरम्यान धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वेगाने घट होत आहे. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी एका दिवसात तीन फुटांनी उतरली. नदीपात्रातील बंधारेही वेगाने खुले होऊ लागले आहेत. बुधवारी सात बंधारे पाण्याखाली होते. गुरुवारी ही संख्या दोनवर आली. पंचगंगा नदीवरील रुई आणि इचलकरंजी हे दोनच बंधारे पाण्याखाली आहेत, राजाराम बंधारा खुला झाला आहे, पण बंधाऱ्यावरील स्लॅब वाहून गेल्याने वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे.
प्रमुख धरणातील पाणीसाठा
धरण टक्केवारी
राधानगरी ३३
तुळशी ४९
वारणा ४२
काळम्मावाडी ३५