अमर पाटील --कळंबा -राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजना टप्पा १ च्या केंद्र शासनाच्या अनुदानातून महापालिकेस ८ कोटी ६६ लाखांचे विशेष अनुदान रंकाळा तलाव संवर्धनासाठी मंजूर झाले. या अनुदानातून तलावात मिसळणाऱ्या सांडपाण्याचे व्यवस्थापन, गणेश विसर्जन कुंड, संरक्षक भिंत, उद्यान व बगीचा विकास ही कामे करण्यात आली. याच अनुदानातून २०१० साली ३५ लाख रुपये खर्चून निसर्ग माहिती व प्रशिक्षण केंद्राची रंकाळा इराणी खणीलगत भव्य इमारत उभारण्यात आली; परंतु या इमारतीची दुरवस्था झाली आहे.तलाव परिसर प्रदूषणमुक्त राहून नैसर्गिक ठेवा जतन व्हावा, स्वच्छ हवेसह नागरिकांना मन:शांती मिळून विरंगुळा प्राप्त व्हावा. परिसरातील नैसर्गिक वनस्पती, पशु-पक्षी यांची माहिती मिळावी व केंद्रात विविध नैसर्गिक प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केंद्राची उभारणी करण्यात आली.इमारत उभी केल्यापासून आजतागायत वापराविना धूळखात पडून आहे. या परिसराला गारवेल व काटेरी वनस्पतींनी विळखा दिला आहे. इमारतीकडे जाणारा रस्ताच झालेला नाही. इमारतीभोवती पथदिवे नसल्याने आंधाराचे साम्राज्य असून, इमारतीतील स्वच्छतागृहाचे दरवाजे मोडण्यात आले आहेत. परिसराचा वापर मद्यपी, प्रेमीयुगुले, जेवणावळीसाठी जास्त होत आहे.यामुळे पालिकेने नेमकी कोणती निसर्ग माहिती व नेमके कसले प्रशिक्षण केंद्र ३५ लाख खर्चून उभा केले, याचे उत्तर पालिका प्रशासनालाच ठाऊक. या केंद्राच्या दोन खोल्या वापराविना बंद, तर एका खोलीत व्हाईट आर्मीच्या बोटी व औषधे ठेवण्यासाठी होतो. इमारतीच्या देखभालीसाठी पालिका कर्मचारीच नियुक्त नाही, त्यामुळे या केंद्राची दुरवस्था झाली आहे.इमारत परिसरातील गैरप्रकार रोखालाखो रुपये खर्चून वापराविना उभ्या असलेल्या केंद्राची व परिसरातील निसर्ग संवर्धनाची जबाबदारी परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघ, निसर्गप्रेमी संस्था, परिसरातील शाळांतील विज्ञान व पर्यावरण मंडळांना दिल्यास किमान निसर्गाचे संवर्धन तरी होईल. केंद्रातील बंद खोल्यांचा विधायक समाजकार्यासाठी, विरंगुळा केंद्र म्हणून वापर झाल्यास किमान इमारतीचा वापर होऊन परिसरातील गैरप्रकारांना आळा बसेल.
रंकाळा निसर्ग माहिती केंद्राची दुरवस्था
By admin | Published: March 04, 2016 12:46 AM