कोल्हापूर : हेल्मेट न घालता वाहन चालविणे, मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे, दुचाकीवरून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून जाणे अशा एक ना अनेक प्रकरणांत प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)ने गेल्या तीन महिन्यांत कारवाईचा बडगा दाखवीत परवाने निलंबित करण्यासह सुमारे ६४ लाखांचा दंड वसूल केला.गेल्या तीन महिन्यांत वाहतूक सुरक्षा मोहिमेअंर्तगत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शहरासह जिल्हाभरात अवैधरीत्या वाहन चालविणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यात कार्यालयाने जिल्हाभरात नेमलेल्या भरारी पथकाद्वारे हेल्मेट न वापरणे, रिफ्लेक्टिव्ह टेप न लावणे, मोबाईलवर बोलत वाहने चालविणे , क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून वाहने हाकणे, चारचाकी गाड्यांना अवैधरीत्या फिल्मिंग करणे, वाहन चालविण्याचा परवाना न बाळगणे, सादर न करणे, गाडीची कागदपत्रे, इन्शुरन्स नसणे, आदी प्रकारच्या अवैध वाहतुकीला चाप व शिस्त लावण्यासाठी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातून सुमारे ६४ लाख ९ हजार २२९ इतका महसूल दंडरूपाने मिळवला आहे.
प्रत्येकाने वाहतुकीचे नियम, गाडीची कागदपत्रे, इन्श्युरन्स, योग्य प्रकारचा वाहन क्रमांक, आदी बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. जे तपासणीदरम्यान दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.- अजित शिंदे,प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर
तीन महिन्यांत केलेली कारवाई अशी (कंसात प्रकरणे)हेल्मेट न बाळगणे - ११६ ,रिफ्लेक्टिव्ह टेप न लावणे- ३००, दोषी वाहने (५०), मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे ( १३०) , दुचाकीवरून क्षमतेपेक्षा अधिकजण बसून प्रवास करणे ( ५१), फिल्मिंग ( ८५), क्रमांक योग्य व नसलेली वाहने ( २२४), वाहन चालविण्याचा परवाना नसणे, सादर न करणे ( ९९१) अशा प्रकरणांत दोषी वाहनचालकांवर कारवाई करीत ६४ लाख ९ हजार २२९ रुपयांचा दंड आकारण्यात आला.