अमर मगदूमराशिवडे : राऊतवाडी धबधब्याच्या कड्यावर जाऊन स्टंट करणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. तर, दुचाकीवर स्टंटबाजी करणाऱ्या युवकांकडून लाखोंचा दंड वसुल करण्यात आला. यावेळी सातजणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. काल, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होती.राधानगरी येथील राऊतवाडी धबधब्यासह तालुक्यातील अन्य ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने वर्षा पर्यटनासाठी येत आहेत. या ठिकाणी मद्यपी, हुल्लडबाज पर्यटकांमुळे सामान्यांना मोठा त्रास होत आहे. अशा मद्यधुंद अवस्थेत हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर राधानगरी पोलीसांनी कारवाईचा बडगा सुरु ठेवला.धबधब्याजवळ जीवघेणे स्टंट करणे, तिब्बल सीट, जोरात दंगा करणे, कर्णकर्कश हाँर्न वाजविणे आदी त्रासदायक प्रकार काही हुल्लडबाज पर्यटकांकडुन होत आहे. अशा पर्यटकांना विनंती करणाऱ्या पोलिसांनाच मद्यपी पर्यटकांकडुन शिवीगाळीचे प्रकार घडले. त्यामुळे पोलिसांनी खाक्या दाखवत कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईचे नागरिकांतुन स्वागत होत आहे.कंटेनर अडकल्याने वाहतूक खोंळबलीया मार्गावरील अवघड वळणावर कंटेनर अडकल्याने घरी परतणाऱ्या पर्यटकांची मोठी अडचण झाली. अनेक चार चाकी वाहणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी होती. दाजीपूर घाटातील रस्ता खराब झाला असल्याने दाजीपूर, ओलवन मार्गे अरुंद रस्त्यावरुन मोठी वाहने येत आहेत. यामुळे सुमारे चार तास वाहतूक खोंळबली.
कोल्हापूर: राऊतवाडी धबधब्यावर हुल्लडबाज, मद्यधुंद तरुणांना पोलिसांनी चोपले; लाखोंचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 3:55 PM