उद्धव गोडसेकोल्हापूर : हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या बंददरम्यान जमावाने दगडफेक करून दंगल माजविल्यानंतर पोलिसांनी सुमारे ४०० संशयितांवर गुन्हे दाखल केले. ३६ जणांना अटकही झाली. विशेष म्हणजे बंदची हाक देणारे आणि दंगल घडविणाऱ्या एकाचाही यात समावेश नाही. त्यामुळे खरे सूत्रधार नामानिराळेच राहिले असून, दंगलीचे परिणाम काही हुल्लडबाज तरुण आणि त्यांचे कुटुंबीय भोगत आहेत.सोशल मीडियातील चिथावणीखोर आवाहनाला बळी पडून कोल्हापुरातील हजारो तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजेरी लावली. तिथे कोणताही मागचा-पुढचा विचार न करता तरुणांनी हातात दगड घेतले. आक्रमक बनलेल्या तरुणाईला आवर घालण्यासाठी एकही नेता चौकात थांबला नाही. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील चर्चेच्या निमित्ताने अनेक नेते गायब झाले. काहींनी तापलेले वातावरण पाहून काढता पाय घेतला. तत्पूर्वी जमावाला आक्रमक बनविण्याची संधी एकानेही सोडली नाही. परिणामी, नको तेच घडले आणि शहरात ठिकठिकाणी दगडफेक होऊन सामाजिक सलोख्यालाही भगदाड पडले.
दंगलीतील सुमारे ४०० संशयितांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून तातडीने ३६ जणांना अटक केली. मात्र, यात बंदची हाक देणारे नेते, संघटनांचे पदाधिकारी आणि त्यांना फूस लावणाऱ्या सूत्रधारांचा समावेश नाही. दंगलीला कारणीभूत ठरलेल्या अनेकांना पोलिस ओळखतात. पोलिसांच्या डोळ्यांसमोरच सारे काही घडले. तरीही त्या संशयितांची नावे एफआयआरमध्ये नाहीत हे विशेष. एफआयआरमध्ये नाव नसल्याने त्यांना अटक करण्याचा प्रश्नच नाही. त्याउलट ज्यांनी चिथावणीला बळी पडून दगड भिरकावले, ते मात्र पोलिसांच्या नजरेत आले. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून पोलिस दंगलखोरांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दंगलखोरांचे पाठीराखे कोण?
दंगलीनंतर तातडीने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापुरात येऊन पोलिस आणि काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्याच बैठकीत त्यांनी दंगलीच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना देणे अपेक्षित होते. मात्र, तसे घडले नाही. पोलिसांनीही स्वत:हून बंदचे आवाहन करणाऱ्यांची नावे फिर्यादीत घेतली नाहीत. त्यामुळे दंगल घडवणाऱ्यांचे पाठीराखे कोण? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.
पोलिसांकडून टाळाटाळ
गुन्हे दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना एफआयआरची प्रत मिळू नये, याची खबरदारी पोलिसांनी घेतली. बंदचे आवाहन करणाऱ्यांबद्दल वारंवार विचारणा करूनही पोलिस अधिकाऱ्यांनी तपासाचे कारण देऊन टाळाटाळ केली.बहुजनांची मुले अडकलीपोलिसांनी गुन्हे दाखल केलेल्या संशयितांमध्ये सर्वच मुले बहुजनांची आहेत. गुन्हे दाखल झालेल्या १८ ते २५ वयोगटातील तरुणांचे करिअर धोक्यात आले, त्यामुळे आता पालकांची झोप उडाली आहे. आपल्या मुलांना यातून बाहेर काढण्यासाठी पालक वकिलांना घेऊन पोलिस ठाण्यात चकरा मारत आहेत.