प्रदीप शिंदे-- कोल्हापूर -‘केल्याने होत आहे रे...’ या उक्तीनुसार रंजलेले-गांजलेले, दु:खी-कष्टी, दुबळ्या लोकांना स्वत:कडून मदत तसेच युवा पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी ‘जनस्वास्थ्य दक्षता समिती’ने कोल्हापूर जिल्ह्यात मोठे योगदान दिले आहे. समितीची ही चळवळ आता जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता महाराष्ट्रभर विस्तार वाढत आहे. कुष्ठरोग्यांची सेवा हे माझ्या जीवनातील राहिलेले अपुरे कार्य आहे, असे महात्मा गांधी म्हणत. त्यांचे हेच कार्य पूर्ण करण्यासाठी जनस्वास्थ्य दक्षता समितीचे प्रमुख दीपक देवलापूरकर यांनी शारीरिक व मानसिक अपंगत्वाने त्रस्त झालेल्या कुष्ठरुग्णांचे वैद्यकीय व सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या हेतूने १९८३ पासून ‘स्वाधारनगर’ कुष्ठ वसाहतीत मदतकार्यास सुरुवात केली. स्वावलंबी गृहनिर्माण योजना, अल्पइंधन चुली, वृक्षारोपण, वसाहतीमध्ये रस्ते, वीज, पाणी, शौचालय, इत्यादी सुविधा मिळवून देणे, तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी दुग्धव्यवसाय, शिलाई, सायकल दुरुस्ती, किराणा दुकान, कुक्कुटपालन व शेळीपालन अशा निरनिराळ्या व्यवसायांसाठी मदत करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून पुढे कुष्ठपीडितांमधून साक्षी महिला विकास संस्था स्थापन झाली. कुष्ठपीडितांच्या मुलांना या माध्यमातून शैक्षणिक मदत व कुष्ठपीडितांचे पुनवर्सन केले जाते. वाढती लोकसंख्या, परिणामी निसर्गाचा वाढता ऱ्हास, पाणी यांचे प्रदूषण तसेच पोलिओ, पक्षाघात, अंधत्व, मतिमंदत्व, वृद्धत्व असे अनेक गंभीर प्रश्न हे प्रामुख्याने समाजामध्ये असणारे गैरसमज, अंधश्रद्धा, अज्ञान बेपर्वाईतून निर्माण झाले आहेत. हे प्रश्न वेळीच सोडविण्याचा प्रयत्न केला नाही तर समाजापुढे पर्यायाने देशामध्ये स्वास्थ्याबाबत गंभीर परिणाम होऊन शकतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी १९९४ मध्ये ‘जनस्वास्थ्य दक्षता समिती’ची स्थापना करण्यात आली. यामध्ये कोल्हापूरमधील अनेक सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय व्यावसायिक, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी झाले. कोणत्याही अपेक्षेची किंवा कोणत्याही अनुदानाची वाट न पाहता आरोग्य व पर्यावरण या विषयांवर त्यांच्यातर्फे कोल्हापूर जिल्ह्यात मोठी चळवळ उभी करण्यात आली आहे. व्यसनामुळे संपूर्ण तरुण पिढी आणि समाजजीवन उद्ध्वस्त होत असल्यामुळे गुटखा, तंबाखू, धूम्रपान व दारू या व्यसनांविरोधी युवा पिढी चळवळ जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीने सातत्याने राबविण्यात आली. त्यांचे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. याचा एक भाग म्हणून १९९६ मध्ये एका गुटखा कंपनीने दहीहंडी कार्यक्रम प्रायोजित केला होता. यावेळी दहीहंडी कार्यक्रमावेळी आरोग्य दिंडी काढून त्याला विरोध केला. या आरोग्य दिंडीत शेकडो युवकांनी सहभाग नोंदविला. याची दखल घेऊन संबंधित कंपनीने आपले प्रायोजकत्व मागे घेतले. त्यामुळे त्यानंतर येणारा गणेशोत्सवदेखील सर्व प्रकारच्या व्यसनांच्या जाहिरातींपासून मुक्त झाला.या यशानंतर काही उपाहारगृहे व हॉटेलमध्ये धूम्रपान केले जाते. त्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने छापे टाकण्यात आले व धूम्रपान करणाऱ्यांविरुद्ध व हॉटेल, उपाहारगृह चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाही करण्यात आली. एस. टी. बसस्थानक परिसर, गर्दीच्या ठिकाणी गुटखा व तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या व्यक्तींना समितीतर्फे गुलाबपुष्प देऊन, त्यांचा सत्कार करून त्यांना असे पदार्थ आरोग्यास किती अपायकारक आहेत याचे माहितीपत्र भेट म्हणून देण्यात येत होते. अशा अपमानस्पद अभिनव आंदोलनामुळे अनेकजणांनी रस्त्यांवर थुंकणे सोडून दिले. अनेकजण संस्थेला वैयक्तिकरीत्या भेटून तसेच फोन करून या उपक्रमात सहभागी झाले.शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत भेट देऊन त्यांनी व्यसनविरोधी जनजागृती करण्यास सुरुवात केली. २६ जून या अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त दरवर्षी व्यसनवीर राक्षसाचे दहन करण्याचा उपक्रम करण्यात आला. यासह दरवर्षी १ जानेवारी ते ७ जानेवारीदरम्यान जनस्वास्थ सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. आठ दिवसांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ७ जानेवारी रोजी एकाच वेळी जिल्ह्यातील ८०० शाळांतील किमान दोन लाख विद्यार्थी आपल्या शाळा परिसरात मानवी साखळी करतात. याचसोबत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महिलांच्या दारूबंदीला संस्थेच्या वतीने चालना देण्यात आली. याबाबत व्यसनाधीन व्यक्तींना संस्थेतर्फे समुपदेशनही करण्यात येते. मद्यमुक्तीसाठी संस्थेत अल्कोहोलिक अनॅनिमसच्या बैठकाही घेतल्या जातात. या उपक्रमासोबत संस्थेच्या वतीने कचरा व्यवस्थापन कसे करावे याची माहितीपत्रके वाटण्यात आली. दररोज एक किलोमीटर इंधन वाचले तरी प्रदूषण कमी होईल, अशा छोट्या-छोट्या गोष्टींतून त्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात सुरेश शिपूरकर, डॉ. सुभाष आठले, डॉ. वैशाली नानिवडेकर, शामराव कांबळे, अजय अकोळकर, डी. जे. ठिपकुर्ले, दीपा शिपूरकर, आर. वाय. पाटील, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर पतंगे, व्ही. बी. चौगुले, ओंकार पाटील, पूजा गुरव, अलका देवलापूरकर, मीनार देवलापूरकर, सीमा गावडे, करिश्मा चिरमुरे, प्रशांत पाटील, आदी प्रमुख व्यक्ती कार्यरत आहेत. अंघोळ, कपडे धुणे तसेच इतर कारणांसाठी वापरण्यात आलेले पाणी सांडपाण्याच्या गटारी अथवा ड्रेनेजमध्ये न सोडता ते शोषखड्ड्यात सोडले जाते. गरजेनुसार त्याचा वापर बागेतील फूलझाडांसाठी केला जातो. यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होते. घरगुती कचरा व्यवस्थापनापासून खतनिर्मिती, टेरेसवर भाजीपाला लागवड, पक्ष्यांची घरटी असे उपक्रम त्यांनी आपल्या घरी केले आहेत. त्यांचा हा उपक्रम पाहण्यासाठी अनेक महाविद्यालये, शाळेतील विद्यार्थी येतात.आपल्यापासूनच सुरुवातदीपक देवलापूरकर यांनी पर्यावरण रक्षणाची सुरुवात स्वत:पासूनच केली. इको-फ्रेंडली हाऊस तयार करून सर्वांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी आपल्या घरी ‘पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर’ करण्याचा संकल्प केला. निसर्गस्रोतातून मिळणारे पाणी साठवून त्याचा पुनर्वापर करायचा या हेतूने बांधकामाची रचना केली. पावसाळ्यात घराच्या छतावर पडणारे पाणी चेंबरमध्ये एकत्र करून नलिकेच्या साहाय्याने जमिनीखाली बांधलेल्या टाकीत साठविले. या पाण्याचा वापर देवलापूरकर कुटुंबीय वर्षभर स्वयंपाकासाठी व पिण्यासाठी करतात.
‘जनस्वास्थ्य दक्षता समिती’ची झेप
By admin | Published: March 06, 2016 11:36 PM