काेल्हापूर : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाल्याचा सर्वाधिक फटका खाद्यतेलांना बसला आहे. गेल्या वर्षी गगनाला भिडलेला भाव आता कुठे आवाक्यात येत असताना युद्धानिमित्त दर पुन्हा वेगाने चढू लागला आहे.पामतेल किलोमागे २० रुपयांनी वाढले आहे. उर्वरित तेलाच्या दरात ३ ते ५ रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकाही अंतिम टप्प्यात आहेत. त्या झाल्यानंतर खाद्यतेलाचा दर पुन्हा उसळी घेणार असल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
गेल्या वर्षी खाद्यतेलाचा दर दुप्पट, तिपटीने वाढला होता. शेंगदाणा तेल अडीचशे रुपयांवर गेले होते. सरकी, सोयाबीन, सूर्यफूलदेखील पावणेदोनशे रुपये किलोवर पोहोचले होते. यामुळे स्वयंपाकघराचे बजेटच कोलमडले होते. खाद्यतेलावरील आधारित पदार्थांचे दरही वाढले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घरात आणि घराबाहेर जेवणेही खर्चिक होऊन बसले होते.दिवाळीनंतर मात्र प्रती आठवडा पाच रुपये याप्रमाणे दर उतरत गेल्याने दिलासा मिळाला होता. आता बऱ्यापैकी १५० ते १६५ रुपये किलोपर्यंत दर स्थिरावला होता; पण या चार दिवसांपासून पुन्हा दरात वाढ सुरू झाली आहे. शेंगदाणा १७२, सूर्यफूल १७०, सोयाबीन व सरकी १५६, पामतेल १४६ रुपये किलो असा तेलाचा दर आहे.चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे खाद्यतेलाचा दर वाढविण्यावर मर्यादा आली होती. दर स्थिर ठेवण्याबाबतही व्यापाऱ्यांवर दबाव होता; पण आता या निवडणुकाही संपत आल्या आहेत. मतदानाचा अंतिम टप्पा सुरू आहे. त्यामुळे आता हळूहळू दर वाढविण्याची मानसिकता तयार केली जात आहे.त्याला रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे निमित्त होऊन दरवाढ पुढे रेटली जात आहे. आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय केंद्राने आधीच घेतला असला तरी आता युद्धजन्य परिस्थिती पुरवठा व मागणीचे चक्र विस्कळीत होण्याची शक्यता आहे. शिवाय पामतेलाचा दर वाढल्याने इतर तेलांच्या दरातही वाढ झाली आहे.
खाद्यतेलाचा दर वाढण्याला आंतरराष्ट्रीय घटना कारणीभूत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दरवाढ सुरूच राहणार आहे. बऱ्यापैकी आयात तेलावर अवलंबून राहावे लागत असल्याने दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. - सिद्धार्थ भिवटे, खाद्यतेल व्यापारी