कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पावसाची अधूनमधून भुरभुर राहिली. दोन दिवस खडखडीत ऊन पडल्याने बळीराजाची चिंता वाढली असून पावसाने एकदम पाठ फिरवली तर खरीप पिके अडचणीत येण्याची शक्यता आहे.चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने एकदम दडी मारली, अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरीही बंद झाल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. आणखी तीन-चार दिवस पाऊस सुरू झाला नाहीतर डोंगर माथा व माळरानावरील पिके अडचणीत येणार आहेत.
‘मृग’ नक्षत्रानंतर ‘आर्द्रा’ नक्षत्रानेही चांगली सुरुवात केल्याने खरीप पिके चांगलीच तरारली होती; पण पावसाने अचानक चार दिवस दडी मारली, ही शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी आहे. रविवारी दिवसभर तर कडाक्याचे ऊन पडले होते. सप्टेबर महिन्यात जसे खरपाड पडते तसे ऊन लागत होते.रविवारी रात्रीपासून वातावरणात थोडा बदल होत जाऊन अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सोमवारी दिवसभर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची भुरभुर राहिली. अधूनमधून हलक्या सरी कोसळल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.
धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पातळीत घट झाली आहे. पंचगंगेची पातळी १४.८ फुटापर्यंत खाली आली आहे. पंचगंगा नदीवरील ‘इचलकरंजी’, ‘तेरवाड’, ‘शिरोळ’ येथील तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत.