निपाणी : संततधार सुरू असलेल्या पावसाने वेदगंगा व दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वेगाने वाढ झाली आहे. यामुळे पुराचा धोका निर्माण झाला असून, तालुक्यातील काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. नजीकच्या कोडणी येथे घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे नागरिकांचे काही प्रमाणात स्थलांतर करण्यात आले आहे. प्रचंड वेगाने पाणी पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांना २०१९च्या पुराची पुनरावृत्ती होणार का? याची चिंता लागली आहे.
गेल्या २४ तासांत निपाणी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पर्जन्यमापक केंद्रावर ९०.४ मिलिमीटर, सौंदलगा येथील पर्जन्यमापक केंद्रावर ५३.२ मिलिमीटर, निपाणी येथील कृषी विभागाच्या पर्जन्यमापक केंद्रावर ९८.० मिलिमीटर तर गळतगा येथील पर्जन्यमापक केंद्रावर ८६.० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने आतापर्यंत कारदगा-भोज, भोजवाडी- कुन्नूर, जत्राट-भिवशी व अकोळ-जत्राट हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, घरांमध्ये पाणी शिरले आहे.
निपाणी - इचलकरंजी मार्गावर असलेल्या लखनापूर ओढ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. संभाव्य पूरस्थिती ओळखून तालुका प्रशासनाने एनडीआरएफची टीम नियुक्त केली आहे.
*जवाहर तलाव ओव्हरफ्लो*
निपाणी शहराची तहान भागवणाऱ्या जवाहर तलावाची पाणी पातळी ४६ फुटांवर गेली असून, तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे निपाणी शहराची पुढील वर्षाची चिंता मिटली आहे.
फोटो लखनापूर : निपाणी - इचलकरंजी मार्गावर असलेल्या ओढ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली.