इचलकरंजी : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जातील सर्व रकाने भरणे अत्यावश्यक आहे; अन्यथा उमेदवारी अर्ज रद्द होईल, असा इशारा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी दिला.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांची बैठक प्रांताधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी जिरंगे बोलत होत्या. बैठकीसाठी राष्ट्रीय कॉँग्रेसच्यावतीने अशोक केसरकर, भारतीय जनता पक्षाचे विलास रानडे, शहाजी भोसले, निधर्मवादी जनता दलाचे बशीर जमादार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दत्ता माने, रमेश पाटील, अॅड. भरत जोशी, संजय हणबर, पोलीस निरीक्षक सतीश पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख, पालिकेचे कामगार अधिकारी विजय राजापुरे, आदी उपस्थित होते.जिरंगे म्हणाल्या, निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन सर्वच उमेदवारांकडून होणे अत्यावश्यक आहे. उमेदवार उभे करतील ते फलक किंवा वितरित करतील ते ती प्रसिद्धीपत्रके यांच्यावर प्रशासकाचे नाव, दूरध्वनी क्रमांक, छापण्यात आलेल्या पत्रकांची माहिती बिनचूक देणे अत्यावश्यक आहे.निवडणूक आयोगामार्फतच मतदान ओळखीसाठी संबंधित मतदारांना मतदान स्लिपचे वाटप करण्यात येणार आहे. एखाद्या उमेदवाराने किंवा पक्ष-आघाडीने मतदान स्लिप वाटायचे झाल्यास त्यावर उमेदवाराचे छायाचित्र, त्याचे नाव किंवा पक्षाचे चिन्ह वापरता येणार नाही. (प्रतिनिधी)सहा गावे व २४६ मतदान केंद्रेइचलकरंजी विधानसभा मतदारसंघात शहरासह सहा गावे आहेत. याठिकाणी एकूण २४६ मतदान केंद्रे असून, या मतदान केंद्रांवर १२३० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाईल. त्यापैकी एक मतदान केंद्र उपद्रवी व दोन ठिकाणे आर्थिकदृष्ट्या संवेदनशील असतील. मात्र, मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळी भरारी पथके तयार केली जातील, असेही निवडणूक निर्णय अधिकारी जिरंगे यांनी स्पष्ट केले.
अर्जातील सर्व रकाने न भरल्यास उमेदवारी रद्द होण्याचा धोका
By admin | Published: September 17, 2014 11:30 PM