कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ११ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये इचलकरंजीतील ३, आरुळ व परळे निनाई (ता. शाहूवाडी) येथील २; तर आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी या तालुक्यांतील प्रत्येकी १; तसेच सातारा जिल्ह्यातील एका डॉक्टरचा समावेश आहे. दिवसभरात चौघे कोरोनामुक्त झाले असून, त्याना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत एकूण ७२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.गेल्या आठवड्याभरात कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे; तर इचलकरंजी, अडकूरसह अनेक ठिकाणी समूह संसर्गाचा धोका वाढत असल्याचे चित्र पुढे येत आहे.मंगळवारी सायंकाळी पहिल्या टप्प्यात प्रशासनास ९९ चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यांपैकी ९६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये भादवण (ता. आजरा) येथील ६५ वर्षीय महिलेचा व स्वत:वर उपचारांसाठी डोंबिवलीहून थेट कोल्हापुरात आलेल्या मारली (ता. पाटण, जि. सातारा) येथील डॉक्टरचा समावेश आहे.
रात्री दुसऱ्या टप्प्यात प्रशासनास आणखी नऊजणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यामध्ये इचलकरंजीतील कुडचे मळा येथे दोन, तर गुरुनानक नगरात एक, त्याशिवाय शाहूवाडी तालुक्यातील आरुळे येथील २९ वर्षीय पुरुष, तर परळे निनाई येथील ७१ वर्षीय वृद्धेचा समावेश आहे. याशिवाय गडहिंग्लज, कुदळवाडी (ता. राधानगरी), गंगापूर (ता. भुदरगड), अडकूर (ता. चंदगड) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा अहवाल पॉझीटिव्ह आला.दिवसभरात ११४३ जणांची तपासणीमंगळवारी दिवसभरात जिल्ह्यातील १९ तपासणी केंद्रांवर ११४३ जणांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी लक्षणे दिसलेल्या ३२२ जणांचे घशातील स्राव घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.तालुकानिहाय रुग्णसंख्याआजरा- ७९, भुदरगड- ७६, चंदगड- ९१, गडहिंग्लज- १०४, गगनबावडा- ७, हातकणंगले- १६, कागल- ५७, करवीर- २५, पन्हाळा- २९, राधानगरी- ६९, शाहूवाडी- १८६, शिरोळ- ८, कोल्हापूर महापालिका हद्द- ४७, नगरपालिका (इचलकरंजी ३८, जयसिंगपूर ३, कुरुंदवाड १) - ४२, इतर जिल्हे व राज्य (सातारा १, पुणे २, सोलापूर ३, मुंबई २, नाशिक १, कर्नाटक ४, आंध्रप्रदेश १)- १४.एकूण रुग्णसंख्या-८५०.