कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन रात्रीचा दिवस करून कोरोनाला प्रतिबंधित करणे व मृत्यूदर कमी करण्यासाठी कार्यरत आहे. दुसरीकडे मात्र गांधीनगर बाजारपेठेतील गर्दी डोकेदुखी ठरत आहे. या बाजारपेठेत ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची गर्दी होत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे येथे होणाऱ्या गर्दीचा परिणाम संसर्ग वाढण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
उचगाव, गांधीनगर, वळीवडे, गडमुडशिंगी व चिंचवाड हद्दीत गांधीनगर बाजारपेठ विस्तारली आहे. उचगाव व गडमुडशिंगी येथे रुग्णांची संख्या वाढत आहे. गांधीनगरमध्येही कोरोनाची धास्ती कायम आहे.
चौकट :
गांधीनगरमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय अन्य व्यवसाय चोरी चोरी चुपके चुपके सुरू आहेत. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवसायांवर बंदी आदेश आहे. तरीही काही दुकानदार शटर बंद करून व्यवसाय करत आहेत. त्यामुळेही ग्राहकांची संख्या वाढून संसर्ग वाढण्याची भीती निर्माण होत आहे.
ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करत नसल्याने या बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. त्यामुळे गांधीनगरात पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासन हतबल झाले आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.