गणपती कोळी -- कुरुंदवाड -राज्य पशुधन पर्यवेक्षकांच्या चुकीच्या धोरणामुळे हेरवाड (ता़ शिरोळ) येथील राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लाखो रुपये किमतीची औषधे मुदतबाह्य होऊन पडून आहेत़ शिरोळ तालुक्यात असे दहा दवाखाने असून, मुदतबाह्य झालेल्या औषधांचा आणखीन मोठा साठा सापडण्याची शक्यता आहे़ शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय मालमत्तेचा एकप्रकारे नासधूस करण्याचा प्रकार असून, प्रशासन, लोकप्रतिनिधींनी याची गंभीर दखल घेऊन दोषींवर योग्य ती कडक कारवाई करण्याची गरज आहे़ शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांच्या संवर्धन व संगोपनासाठी राज्य पशुसंवर्धन विभागाकडून विविध सेवा दिली जाते़ यामध्ये जनावरांचे लसीकरण, विविध साथींच्या आजारांवर उपचार करण्यासाठी औषधे, सलाईनचा मोफत पुरवठा केला जातो़ तालुका पशुसंवर्धन केंद्रातून पशुवैद्यकीय दवाखान्याद्वारे शेतकऱ्यांना लाभ दिला जातो़ मात्र, पशुधन पर्यवेक्षकांना उपचार करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत हेरवाड येथील पशुधन पर्यवेक्षक उत्तम पाटील यांनी शासनाकडून आलेल्या औषधांचा वापरच न केल्याने लाखो रुपये किमतीची औषधे, सलाईन, पावडर, टॅबलेटस मुदतबाह्य होऊन पडल्या आहेत़ स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला़शिरोळ तालुक्यात राज्य शासन श्रेणी-२ च्या उदगाव, चिपरी, दानोळी, शिरढोण, यड्राव, जांभळी, हेरवाड, राजापूर, नृसिंहवाडी, शेडशाळ असे दहा पशुवैद्यकीय दवाखाने आहेत़ पशुधन पर्यवेक्षकांच्या रिक्त पदांमुळे या दवाखान्याची जबाबदारी ए़ एल़ गावडे, उदय शिंदे, उत्तम पाटील व सुरेश कांबळे या पशुधन पर्यवेक्षकांवर आहे़ शेतकऱ्यांच्या जनावरांना सेवा देण्यासाठी लसीकरण, औषधे, बी-बियाणे तालुका पशुवैद्यकीय सहायक आयुक्तालयाकडून दवाखान्यात पुरवठा केला जातो़ मात्र, पशुसंवर्धन पर्यवेक्षकांनी लसीकरणाशिवाय जनावरांवर इतर उपचार करण्यास अधिकार नसल्याचे कारण पुढे केल्याने दोन-अडीच वर्षांपासून औषधे मुदतबाह्य होऊन पडून आहेत़ऐन महागाईत शेतकरी जनावरांना उपचार करण्यासाठी खासगी दवाखान्यातून महागडे औषध आणून मेटाकुटीला आला आहे, तर दुसरीकडे पशुधन पर्यवेक्षकांच्या आडमुठ्या धोरणामुळे लाखो रुपये किमतीची औषधे मुदतबाह्य होऊन पडून राहिल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असून, मुदतबाह्य औषधांचा साठा जप्त करून शासनाने दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे़शासनाच्या पशुधन विभागाकडून शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी वापरण्यात येणारी औषधे व बी-बियाणांचा पुरवठा वेळोवेळी पशुवैद्यकीय दवाखान्यात वितरित केला आहे़ मात्र, पशुधन पर्यवेक्षकांनी जाणीवपूर्वक असहकार्याची भूमिका घेतल्याने हा प्रकार झाला असून, पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबतचा अहवाल पाठविला आहे़ - डॉ़ वाय़ बी़ पुजारी, जयसिंगपूर पशुसंवर्धन सहायक आयुक्त.
पशुवैद्यकीय दवाखान्यात मुदतबाह्य औषधांचा धोका
By admin | Published: June 24, 2016 12:15 AM