कोल्हापूर : रंगमच प्रस्तुतीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘रितीका कलारंग’ या कार्यक्रमात रविवारी सायंकाळी कथ्थक विशारद रितीका शीतल पाटील यांनी कथ्थक नृत्यातून तोडे, गतनिकास, भजन, भावमुद्रा व दशावतार हा नृत्याविष्कार सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. येथील केशवराव भोसले नाट्यगृहात डॉ. शीतल पाटील व डॉ. पूजा पाटील परिवाराच्या वतीने या कथ्थक नृत्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सुमारे बारा वर्षे कथ्थक नृत्याचे परिपूर्ण शिक्षण घेऊन नुकतीच नृत्यविशारद पूर्ण केलेल्या रितीका पाटील यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील व प्रतिमा पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, माजी आमदार सुजित मिणचेकर, डॉ. मोहन गुणे, आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी कथ्थक विशारद रितीका पाटील यांनी गुरुवंदना, गणेशस्तुती, त्रिताल, ठुमरी, होरी, नाईक, पदन्यास ही कथ्थक या शास्त्रीय नृत्याची वैशिष्ट्ये सादर करून उपस्थित रसिकांची वाहवा मिळविली. या कार्यक्रमात शुभांगी तावरे व रितीका पाटील या गुरु-शिष्यांनीही एकत्रित नृत्याविष्कार सादर केला.