आचरा : गावात रात्री येणाऱ्या ताशांचा आवाज कानी पडला आणि आवाटात बोंब उठली ‘उडालो रे उडालो आकाश कंदील उडालो आणि खालल्याचो बाबलो मेलो चिखलात बुडालो... येणार रे येणार आम्ही म्हणतात येणार बाबल्याक काढा शेणार’ मालवणी बोली भाषेत अस्सल हेल काढत आणि वेगवेगळे आवाज काढत एका पाठोपाठ एक उठणाऱ्या बोंबा शिमग्याचा उत्साह वाढवत होत्या. आचरा गावच्या संस्थानकालीन होळी उत्सवाला पारंपरिक ‘रोंबाट’ कार्यक्रमाने बुधवारी प्रारंभ झाला. पाच रामेश्वर मंदिरात व खळनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. या कालावधीत मंदिराजवळील मांडावर होणारे शिमग्याचे खेळ, सोंगा हे प्रमुख आकर्षण असते. आचरा गावचा प्रत्येक उत्सव हा संस्थानकालिन थाटाचा असतो. होळी उत्सव त्याला अपवाद नाही. पुरातन काळापासून साजरा होणारा होळी उत्सव आजही ग्रामस्थ त्याच पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करतात. होळी दिवशी रात्री श्री देव रामेश्वर मंदिराजवळ देव होळी उभारली जाते. तर दुसऱ्या दिवशी आचरा बाजारपेठेनजीक गाव होळी उभी केली जाते. या दोन्ही होळीसाठी पोफळीच्या झाडांचा वापर केला जातो. परंपरेनुसार देव होळीसाठी झाड लगतच्या वायंगणी गावातून सवाद्य मिरवणुकीने आणले जाते. तर गाव होळी ही सरजोशी घराण्याकडून बाजारपेठेतून मिरवणुकीने आणली जाते. पोपळीच्या तोडलेल्या खोडाला आम्रवृक्षाची पाने लपेटून शेंड्याला भगवा ध्वज उभारून होळी उभी केली जाते. त्यानंतर नवस बोलणे, फेडणे कार्यक्रम होतो. त्यानंतर ग्रामस्थांमधून दोघांना नवरा-नवरीचे सोंग देऊन गावात रोंबाट काढले जाते. रोंबाट मिरवणुकीरदम्यान गावात ग्रामस्थांनी रंगपंचमीचाही आनंद लुटला.ही मिरवणूक रामेश्वर मंदिराला प्रदशिक्षा घालून श्री गांगेश्वर मंदिरात विसर्जित झाली. पुढील दिवशी मंदिर व शेवटच्या दिवशी श्री देव रामेश्वर मंदिरात मांडे भरविण्यात येतो. रात्री शिमग्याचे पारंपरिक कार्यक्रम साजरे केले जातात.(वार्ताहर)पाच दिवस गोमूचा नाचशेवटच्या दिवशी रामेश्वर मंदिराच्या मंडपात मांडे भरतो. त्या मांडावर ग्रामस्थांमार्फत बांधली जाणारी विविध सोंगे हे या शिमगोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. तसेच पाच दिवस लहान मुले विविध वेश परिधान करून गोमुचे नाच घेऊन संपूर्ण गावात फिरतात. या पाच दिवस रंगत असलेल्या कार्यक्रमाने गावच्या शिमगोत्सवाची सांगता होते.
आचऱ्यातील ‘रोंबाट’ उत्सव उत्साहात
By admin | Published: March 25, 2016 9:28 PM