शिरोली : आमदारांकडे १०० कोटींची मागणी करणारा मुख्य सुत्रधार शिरोलीचा रियाज शेख हा तुरुंगातुन जामीन मिळताच सुटुन आल्यावर शिरोलीत घरी येताना रात्री अकराच्या सुमारास रस्त्यावर रोड शो करून, फुलांची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत मोठी स्टंटबाजी केली. त्याच्या स्टंटबाजी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले.रियाजने १७ जुलै २०२२ रोजी मुंबई येथील हाॅटेल ओबेरॉय येथे राष्ट्रीय पक्षातील आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क १०० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्याच्यासह योगेश मधुकर कुलकर्णी (वय ५७, रा. पाचपाखाडी- ठाणे), सागर विकास संगवई (३७, रा. पोखरण रस्ता- ठाणे) व जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (५३, रा. नागपाडा मुंबई) मुंबई, ठाणे या चौघांना अटक केली होती.यातील मुख्य सुत्रधार रियाज शेख जामिनावर सुटका झाल्यावर १ ऑगस्ट रोजी जामीन मिळाला, आणि २ ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास शिरोलीला परत आला. महामार्गा लगतच शंभर मिटर वर रियाज शेख घर आहे. रात्री अकरा वाजता घरी येताना एखादा मोठा पराक्रम केला असल्या प्रमाणे किंवा कुस्तीचे मैदान जिंकल्या सारखं आलीशान चारचाकी गाडीच्या बाॅनेटवर बसुन रोड शो केला, तसेच फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत मोठी स्टंटबाजी केली. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला व्हिडिओ मिळाला असता स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजय बोर्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, शिवानंद कुंभार,सागर पाटील यांनी रियाज शेखला शुक्रवारी रात्री आठ वाजता ताब्यात घेतले.आय एम बॅकरियाज तुरुंगातुन जामिनावर सुटुन आल्यावर रोड शो करून फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केलेली व्हिडिओ व्हायरल करून व्हिडिओ खाली आय एम बॅक,मैं हूं डॉन गाणे लावून व्हिडिओ व्हायरल केला आहे.
आय एम बॅक; मंत्रीपदासाठी १०० कोटींची मागणी करणाऱ्या रियाज शेखची 'स्टंटबाजी'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 11:41 AM