अमर पाटील ल्ल कळंबा येणार्या पालिका निवडणुकीचे महत्त्व जाणून आज उपनगरांतील लोकप्रतिनिधी झाडून वाट लागलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागे लागलेत. गेली चार वर्षे नागरिक मात्र ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते’ याचे उत्तर शोधण्यात मग्न होते. आता पावसाळ्यापूर्वी आपल्या विकासकामांची पावती नागरिकांपर्यंत जावी, यासाठी प्रतिनिधी रस्त्यावर फूटभर खडी डांबर ओतत रस्त्यांची मलमपट्टी करून घेण्यात मग्न आहेत. शहराच्या दक्षिणेस लागून असणारी संभाजीनगर, तपोवन, नाळे कॉलनी, राजलक्ष्मीनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, साळोखेनगर, सुर्वे कॉलनी, राजोपाध्येनगर, सानेगुरुजी वसाहत, कळंबा फिल्टर हाऊस, बोंद्रेनगर, शासकीय कारागृह, फुलेवाडी ही उपनगरे आज प्रचंड विस्तारत आहेत. त्यांचे हे चित्र आहे. काही कॉलन्यांची स्थापन होऊन वीस वर्षे झाली तरी त्या ठिकाणी अंतर्गत रस्ते नाहीत, तर काही ठिकाणी दुबार रस्ते तयार करण्यात आले आहेत. कॉलनी अंतर्गत रस्ते करतानाही राजकीय दुजाभाव केला जातो, अशी नागरिकांची तक्रार आहे. अल्प बजेटचे कारण सांगून वेळ मारून नेली जाते. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. नवीन रस्ता झाल्यावर नागरिकांना थोडे हायसे वाटत असतानाच ड्रेनेज किंवा अन्य कामांसाठी रस्ते पुन्हा उकरले जातात. ही किमया फक्त उपनगरांतच घडते. साई मंदिर ते फुलेवाडी रिंगरोड, कळंबा जेल ते देवकर पाणंद अशी नगरोत्थानची कामे रखडलेली आहेत. रिंगरोड रस्त्यास तीन वर्षे डांबर लागले नाही. पादचारी व वाहनधारकांचे चार रस्त्यावर अपघात नित्याचेच ठरलेत. मतांसाठी रस्त्यांची चाललेली धूळफेक पाहता नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी ना पालिका प्रशासन ना प्रतिनिधींना सोयरसूतक असल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्य रस्ते व कॉलनी अंतर्गत रस्ते पादचारी व वाहनधारकांसाठी मृत्यूचे सापळे बनताहेत. पावसाळ्यापूर्वी नागरिकांच्या या मूलभूत प्रश्नांचा पालिका प्रशासन व प्रतिनिधींनी विचार करावा, ही अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांची मलमपट्टी
By admin | Published: June 05, 2014 1:19 AM