पन्हाळा : पन्हाळगडाच्या पश्चिमेस असलेल्या तीन दरवाजा किंवा कोकण दरवाजाकडे येणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता धोकादायक झाला असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी, अशी जोरदार मागणी या भागातील नागरिकांमधून होत आहे.
पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या निकमवाडी, गुढे, रविवार पेठ, इंजोळे, खडेखोळ या गावांतील लोकांना या रस्त्याने पन्हाळ्याला ये-जा करावी लागते या गावच्या लोकांचे जीवन पन्हाळा शहरावरच अवलंबून आहे. येथील वृद्ध, मुले, रुग्ण यांना पायी पन्हाळ्याकडे प्रवास करणे अवघड बनत असल्याने व वाघबीळमार्गे प्रवास करायचा झाल्यास १० ते १२ किलोमीटर जादा अंतर जावे लागत असल्याने या भागातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी तत्कालीन आमदार स्व. यशवंत एकनाथ पाटील यांच्या प्रयत्नांतून तीन दरवाजा ते सोमवार पेठ महादेव मंदिर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले.
सध्या या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे खडी उखडली आहे रस्त्यावर या उकडलेल्या खडीने दुचाकी वाहने घसरण्याचे व छोटे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. खरंतर हा रस्ता तीव्र चढ-उताराचा आहे. वळणांचा देखील आहे. वाहनधारकांना रस्ता खराब झाल्याने वाहन चालविणे मुश्किलीचे झाले आहे. या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे वाहनांचे देखील नुकसान होत असल्याचे अनेक वाहनधारकांनी सांगितले आहे. ह्या रस्त्याची रुंदी कमी असून, तीन दरवाज्याकडून सोमवार पेठेकडे खाली जाताना पन्हाळा स्मशानभूमी येथील तीव्र वळण व वळणाकडेच्या बाजूचा भाग तुटून गेला असून, संरक्षक कठडा तर पूर्णपणे जमिनदोस्त झाला आहे.संरक्षक कठडा बांधणे आवश्यकया मार्गावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संरक्षक कठडा बांधणे आवश्यक आहे. मात्र, याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. सोमवार पेठेकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला खोल दरी असून, येथे संरक्षक ग्रीलची आवश्यकता आहे. रात्रीच्यावेळी येथे एखादी मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्यावर नवीन वाहकाला वाहन चालविण्याचा अंदाज येत नाही, तरी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, रस्त्याच्या बाजूला संरक्षक लोखंडी अथवा कठडे तातडीने बांधावेत, अशी जोरदार मागणी वाहनधारक, नागरिकांच्यावतीने होत आहे.