कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील बहुचर्चीत रस्ते विकास प्रकल्पाचे मूल्यांकन फक्त १८० कोटी रुपयेच होत असल्याचे महापालिकेने केलेल्या त्रयस्थ मूल्यांकनानुसार स्पष्ट झाल्याची माहिती पालिकेतील खात्रीशीर सूत्रांनी दिली. कोल्हापूर शहरातील रस्ते विकास प्रकल्पाची टोलवसुली वादग्रस्त ठरल्यानंतर नवनिर्वाचित भाजप सरकारने या प्रकल्पाच्या फेरमूल्यांकनाचे आदेश दिले. त्यानुसार नोबेल इंटरेस्ट कन्सल्टन्सी इंजिनिअर्स, महापालिका व कोल्हापूर इंजिनिअर्स अॅँड आर्किटेक्टस् असोसिएशनचे पदाधिकारी यांच्याद्वारे गेल्या पंधरा दिवसांपासून फेरमूल्यांकनाची प्रक्रिया सुरू आहे. ही संयुक्त मूल्यांकन तपासणी आज, बुधवारी पूर्ण होणार आहे. या शासकीय तपासणीबरोबरच महापालिकेनेही त्रयस्थपणे या प्रकल्पाची बारकाईने मूल्यांकन तपासणी केली आहे. त्यानुसार ‘आयआरबी’ने २५ कोटी रुपयांची कामे केलेली नाहीत. तसेच कराराचा भंग व डागडुजी, युटिलिटी शिफ्टिंग अशी वजावट करून प्रकल्पाचा खर्च १८० कोटी रुपयांपेक्षा कमी होणार असल्याचे पुढे आले आहे. रस्ते विकास प्रकल्पाची मूळ किंमत २२० कोटी रुपये आहे. ‘आयआरबी’ने प्रकल्पाचा एकूण खर्च ५०० कोटी रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्र यापूर्वीच उच्च न्यायालयात सादर केले आहे. त्यामुळे भविष्यात प्रकल्प खर्चावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.दरम्यान ‘नोबल’कंपनीची फेरमूल्यांकनाची संयुक्त पाहणी आज, बुधवारी संपणार असून, या पाहणीचा अहवाल ३० मेपर्यंत शासनाला सादर करण्याच्या सूचना, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिल्या आहेत. ‘नोबेल’ला संपूर्ण प्रकल्पाचा मूल्यांकन अहवाल देण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेनेही स्वतंत्र मूल्यांकन अहवाल तयार केला आहे. दोन्ही अहवालांची पडताळणी केली जाईल. येत्या दोन ते चार दिवसांत अहवाल येणे अपेक्षित आहे. - नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता व समिती सदस्ययुटिलिटी शिफ्टिंग करारात नमूद असूनही ते झालेले नाही. दर चारशे मीटरवर ठेवलेल्या डांबरी रस्त्यातून नवीन कनेक्शन घेणे किंवा दुरुस्ती करणे शक्य नसल्याने युटिलिटी शिफ्टिंग हा प्रकल्प खर्च ठरविताना कळीचा मुद्दा ठरणार आहे. गेल्या अडीच वर्षांत ‘आयआरबी’ने शहरातील ५० किलोमीटर रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसह अपूर्ण कामे केलेलीच नाहीत. रस्त्यावरील बंद पडलेले दिवे, गटारी व चॅनेलची दुरुस्ती, अपूर्ण पदपथ, बसथांबे, रंकाळा येथे अॅम्पी थिएटर, आदींचे त्याप्रमाणेच मूल्यांकन होणार आहे.
रस्ते प्रकल्पाचा खर्च १८० कोटीच..!
By admin | Published: May 27, 2015 12:26 AM