अहमदनगर : महामार्गावर रस्ता लूट करणारी तिघांची टोळी जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गुरूवारी पकडली. या टोळीतील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. विळद घाटात एक तास सुरू असलेल्या थरारानंतर टोळीतील तिघे पोलिसांच्या हाती लागले. विशेष म्हणजे गुरूवारी चौघांच्या या टोळीने दोन ठिकाणी रस्ता लूट केली. सार्थक हेमंत साळवे (रा. भूतकरवाडी), विकी विजय शिरसाठ, राजू दास (दोघेही रा. बोरुडेमळा, नगर) असे पकडलेल्या तिघांची नावे असून अक्षय मातोडे (रा. बोरुडेमळा) हा पळून जाण्यात यशस्वी झाला. या टोळीने गुरूवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास हुंडेकरी शो रूमसमोर सचिन महादेव पोटे (रा. उस्मानाबाद, हल्ली, विळद घाट) या महाविद्यालयीन तरुणास अडवून लुटले. पोटाला चाकू लावत धाक दाखवून ११ हजार रुपये रोख आणि मोबाईल लुटला. या लुटीनंतर टोळीने विळद घाटाच्यापुढे देहरे शिवारात काळे वस्तीनजीक पुन्हा एक मोटारसायकल अडविली. मोटारसायकलवरील विपुल विहार राखुंडे (रा. सिव्हील हडको, हल्ली विळद घाट) व त्यांच्या मित्राला मारहाण करत त्यांच्याकडील वीस हजार रुपये रोख आणि मोबाईल लुटला. रस्त्याकडेलाच लुटमार होत असताना जिल्हा वाहतूक शाखेची गस्तीवर असलेली पोलीस जीप जात होती. पोलिसांना पाहताच दोघे शेजारच्या उसात तर दोघे मोटारसायकलवरून पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, हवालदार राजू वाघ, अनिल गाडेकर, नाईक सोमनाथ सायंबर यांनी आरोपींचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी पळालेल्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लुटीचा मुद्देमाल हस्तगत केला़ (प्रतिनिधी)सराईत गुन्हेगार अन् माहितगार पोलीसरस्ता लूट करणारे हे चौघेही सराईत गुन्हेगार आहेत. आठवडाभरापासून सलगपणे त्यांनी महामार्गावर लुटमार सुरू केली होती. लुटीच्या या घटनांनी प्रवासी भयभीत होते. पूर्वी गुन्हे शाखेत कार्यरत असलेले राजू वाघ, अनिल गाडेकर यांना सराईत गुन्हेगारांची जंत्री ज्ञात असल्याने त्यांनी या आरोपींना पकडले. जिल्हा वाहतूक शाखेत कार्यरत असले तरी सराईतांची जंत्री अजूनही वाघ, गाडेकर यांच्या तोंडपाठ आहे.
रस्ता लूट करणारी टोळी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2016 11:14 PM