तांबूळवाडी, बागिलगे, डुक्करवाडी, माणगाव, लक्कीकट्टे गावांच्या दरम्यान असलेल्या रस्त्यात पडलेल्या खड्डयांमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित करण्याची मागणी प्रवासी व वाहनचालकांतून होत आहे. सहा वर्षांपूर्वी हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेतून झाला होता. त्यावेळीही या रस्त्याचे काम तत्कालीन ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केले होते.
नागरिकांच्या तक्रारीमुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात आली होती. पंतप्रधान व मुख्यमंत्री सडक योजनेतून झालेल्या रस्त्याची पाच वर्षे देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असते, असा बांधकाम खात्याचा नियम आहे.
मात्र, तांबूळवाडी ते माणगाव दरम्यानच्या पंतप्रधान सडक योजनेतून झालेल्या या रस्त्यावरील खड्डे त्या ठेकेदाराने एकदाही बुजविले नाहीत. त्यामुळे सद्य:स्थितीत या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरची खडीच गायब झाली आहे. त्यामुळे पूर्वी रस्ता होता का? असा सवाल वाहनधारकांतून होत आहे.
या नादुरुस्त रस्त्यावरून साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
हा रस्ता कायम दुर्लक्षित राहिला आहे. आजपर्यंत फक्त एक वेळ या रस्त्यावर दुरुस्तीचे काम झाले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने नवीन रस्ता होईपर्यंत किमान खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी उपसभापती मनीषा शिवणगेकर, सरपंच संजय पाटील (तांबूळवाडी), सरपंच राजू शिवणगेकर (डूक्करवाडी) यांनी केली आहे.